दिन-विशेष-लेख-मौखिक आरोग्य दिवस

Started by Atul Kaviraje, February 05, 2023, 11:06:10 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "दिन-विशेष-लेख"
                                 "मौखिक आरोग्य दिवस"
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०५.०२.२०२३-रविवार आहे, फेब्रुवारी ५ हा दिवस "मौखिक आरोग्य दिवस" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत. .

     व्यक्तिमत्वाशी एवढा घनिष्ठ संबंध असूनसुद्धा ८० टक्के भारतीयांमध्ये मौखिक आरोग्याबाबत जागरूकता आढळून येत नाही. त्यामुळे तोंडाचे व दातांचे आजार आज समाजात मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतात.

     चेहरा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो आणि सुहास्य वदनाने समोर येणाऱ्या व्यक्तीसोबत आपण अगदी सहज जोडले जातो. व्यक्तिमत्वाशी एवढा घनिष्ठ संबंध असूनसुद्धा ८० टक्के भारतीयांमध्ये मौखिक आरोग्याबाबत जागरूकता आढळून येत नाही. त्यामुळे तोंडाचे व दातांचे आजार आज समाजात मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतात. यामध्ये हिरड्यांचे आजार, दातांमध्ये कीड, किडलेल्या दातांमुळे जबड्यात होणारे आजार व मुखकर्करोग प्रामुख्याने दिसून येतात. तोंडाचा वापर केवळ अन्न चावून खाण्यासाठी किंवा बोलण्यासाठीच आहे, असं समजून त्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण मौखिक आरोग्याचा परिणाम शरीराच्या इतर अवयवांवर पण होत असतो. तसंच आपणास असलेल्या वाईट सवयींचा परिणाम मौखिक आरोग्यावर होत असतो (उदा. बिडी, सिगारेट ओढणे, पान, तंबाखू , गुटखा खाणं). त्यामुळे मौखिक आरोग्य जपणं सर्वांगीण स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.

                     काय करावं?--

१. काहीही खाल्यावर खळखळून चूळ भरावी. जेणेकरून दातांमधे अडकलेले अन्नकण निघून जातील.

२. दिवसातून दोन वेळा ब्रश करावा.

३. ब्रश केल्यानंतर दररोज जीभही स्वच्छ करणं आवश्यक आहे.

४. दररोज flossing करा. (जेवणानंतर धाग्याने दातांमधील फटीत अडकलेले अन्नकण काढणं)

५. दर सहा महिन्यांनी दातांच्या डॉक्टरांकडून मशीनने दात स्वच्छ करून घेणं.

                        काय करू नये?--

१. रात्री झोपण्यापूर्वी गोड पदार्थांचं सेवन टाळावं.

२. दाढदुखी व दातदुखीकडे दुर्लक्ष करू नये.

३. हिरड्यांमधून रक्त, पू येत असल्यास ब्रश करणं बंद करू नये व ताबडतोब तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

४. तोंडाला दुर्गंधी येत असल्यास तंबाखू, मिशरी असल्या पदार्थांचं सेवन किंवा वापर करणं टाळावं.

५. दाढ दुखत असल्यास त्यात लवंग भरणं, विक्स लावणं असं केलं जातं, जे अत्यंत चुकीचं आहे. असं करू नये.

     तोंडाच्या स्वच्छतेसाठी दात व जीभ स्वच्छ असणं गरजेचं असतं. जेवल्यानंतर दातांमध्ये बरेच अन्नकण अडकून राहतात. त्यामुळे तोंडाला दुर्गंधी येते व दातांवर चिकटपणा जाणवायला लागतो. वयाच्या साधारणतः तिसऱ्या वर्षापासून तोंडात दात यायला सुरूवात होते. तेव्हापासूनच त्यांची काळजी घेतली गेली पाहिजे. लहान मुलं गोड पदार्थांचे अती प्रमाणात सेवन करतात, म्हणून पालकांनी मुलांच्या इतर स्वच्छतेसोबतच दात व तोंडाची स्वच्छता ठेवली पाहिजे.

                 दात आणि हिरड्यांच्या मजबुतीसाठी--

१. अन्न ३२ वेळा चावून खाल्लं पाहिजे.

२. गाजर, काकडी न कापता स्वच्छ धूवून खाल्यास हिरड्या मजबूत होतात.

३. आहारात दुधाचं प्रमाण अधिक असल्यास दात व हाडांची मजबुती वाढते.

४. हिरड्या निरोगी असल्या तरच दात पक्के राहतात.

--डॉ. मनिषा पगार-मराठे
(दंतविकार तज्ज्ञ)
----------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
                  --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.02.2023-रविवार. 
=========================================