गणपती-पुळे-श्री गणेश-भक्ति कविता-पुळ्याच्या गणेशा, तुला येथून स्मरितो

Started by Atul Kaviraje, February 07, 2023, 11:46:16 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मंगळवार दिनांक-०७.०२.२०२३. आज आपल्या लाडक्या बाप्पाचा वार, श्री गणेशाचा वार. महाराष्ट्रातील, रत्नागिरी जिल्ह्यात, गणपतीपुळे येथे सुप्रसिद्ध असे गणेश-मंदिर आहे. या मंदिराला खूप जुना इतिहास आहे. त्याला मोठा समुद्र-किनाराही लाभला आहे. दर मंगळवार, संकष्टी चतुर्थी, विनायकी चतुर्थी, माघी गणपती, अंगारकी चतुर्थी आणि तश्याच अनेक श्री गणेश कार्यक्रमास येथे भक्तांचा महापूर लोटतो. सारे भक्तगण श्री गणेश मूर्तीचे मनोभावे दर्शन घेतात, व मनोवांच्छित मागणे मागतात. महाराष्ट्र सरकारने गणपती-पुळे हे श्री गणपती क्षेत्र पर्यटन-क्षेत्र म्हणूनही घोषित केले आहे. वाचूया, तर या पुण्य दिनी, गणपती-पुळ्याच्या श्री गणेशाची एक भक्तिमय कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "पुळ्याच्या गणेशा, तुला येथून स्मरितो"

                           "पुळ्याच्या गणेशा, तुला येथून स्मरितो"
                          ----------------------------------

पुळ्याच्या गणेशा, तुला येथून स्मरितो,
मनी भाव ठेवूनिया, तुला वंदितो.

जिल्हा रत्नागिरीतील तुझे एकमेव स्थान
गाजतंय महाराष्ट्रात तुझेच नाम
एकची गणेश तू, देव आहेस महान
भक्तिभावे जनसमुदाय येथे लोटतो,
     पुळ्याच्या गणेशा, तुला येथून स्मरितो,
     मनी भाव ठेवूनिया, तुला वंदितो.

तव दर्शना सारे भक्त होती गोळा
विनायकी, संकष्टीला रूप पाहती डोळा
कृतार्थ होती सारे पाहून तुझा सोहळा
बाप्पा मोरया घोष साऱ्या गगनी गुंजतो,
     पुळ्याच्या गणेशा, तुला येथून स्मरितो,
     मनी भाव ठेवूनिया, तुला पूजितो.

देवस्थाना लाभे तुझ्या किनारा मोठा
पायाशी येऊनि थबकती चंचल लाटा
सागरही तुझ्यापुढे होऊन थिटा
जळाने तुझ्या मूर्तीस अभिषेक करितो,
          पुळ्याच्या गणेशा, तुला येथून स्मरितो,
          मनी भाव ठेवूनिया, तुला नमितो.

प्रत्येक वारी, तुझ्या द्वारी रीघ लागते
दुर्वांकुराची माळा तुझ्या वक्षी रुळते
श्रद्धारूपे भक्त तुज प्रसाद चढवितो
त्यांच्या पुण्याईचे तू घट भरितो,
     पुळ्याच्या गणेशा, तिला येथून स्मरितो,
     मनी भाव ठेवूनिया, तुज प्रणितो.

रूप तुझे मनोहारी, प्रसन्न करिते
तेज तुझ्या मूर्तीचे मनात वसते
मंजुळ घंटानाद तव गाभारी घुमतो
दंग, मुग्ध भाविक हा हात जोडितो,
     पुळ्याच्या गणेशा, तिला येथून स्मरितो,
     मनी भाव ठेवूनिया, तुज भजितो.

थकलीत पाऊले, झाले शरीर जर्जर
शक्तिहीन देह सारा, कमजोर नजर
आस तुझ्या दर्शनाची मनी राखतो
मनोमनी मग तुझे दर्शन घेतो,
     पुळ्याच्या गणेशा, तिला येथून स्मरितो,
     मनी भाव ठेवूनिया, तुज वंदितो.

पुळ्याच्या गणेशा, तुला येथून स्मरितो
मनी भाव ठेवूनिया, तुला वंदितो.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.02.2023-मंगळवार.
=========================================