मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-92-ट्रोजन युद्ध भाग २.१- इलियड: बहिरंगपरीक्षण

Started by Atul Kaviraje, February 07, 2023, 09:40:55 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-92
                                  --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "ट्रोजन युद्ध भाग २.१- इलियड: बहिरंगपरीक्षण आणि संक्षिप्त कथा"

             ट्रोजन युद्ध भाग २.१- इलियड: बहिरंगपरीक्षण आणि संक्षिप्त कथा--
            ---------------------------------------------------------

     आता मात्र अकीलिसची सटकली. हावरट, भित्रा, ठरकी, इ. शिव्यांनी अ‍ॅगॅमेम्नॉनला सर्वांसमोर लाखोली वाहून त्याने शेवटी "युद्धातून आम्ही ढिस" ही निर्णायक धमकी दिली."ढीस तर ढीस", असे अ‍ॅगॅमेम्नॉन म्हणाला. यवनभीष्मच जणू असा वयोवृद्ध पायलॉसचा राजा नेस्टॉर शिष्टाई करू लागला होता, पण तीही फुकट गेली. अ‍ॅगॅमेम्नॉनचे दोघे रक्षक येऊन ब्रिसीसला घेऊन गेले आणि अकीलिस आपल्या २,५०० सेनेसह स्वस्थ बसला, पण रणवाद्यांची गर्जना ऐकून स्फुरण चढणे तर सुरूच होते. शेवटी आपली अप्सरा आई थेटिसला त्याने अ‍ॅगॅमेम्नॉनबद्दल सांगितले. आईनेही आपल्या पोरासाठी ऑलिंपसमध्ये झ्यूसकडे वशिला लावेन असे सांगितल्यावर तो जरा स्वस्थ झाला. झ्यूसनेही थेटिसचे ऐकून हेक्टरकडून ग्रीकांना चांगली अद्दल घडेल पण बायको हेरा न रागावेल, अशी तजवीज करायला सुरुवात केली.

     अखेरीस ग्रीकांचा बेत ठरला. एक निर्णायक हल्ला होऊनच जाऊदे म्हणून. त्यातच अ‍ॅगॅमेम्नॉनला स्वप्न पडले आणि त्याचा विजय निश्चित होईल अशी आकाशवाणी त्यात झाली. मग त्याने एक मोठी सभा बोलावली, पण वेगळेच कैतरी बोलू लागला, "आपल्याला ट्रॉय घ्यायला जमणार नाही", वगैरे. बहुतेक लोकांचा रिस्पॉन्स पहायचा असावा. मग ग्रीक लोक परतीच्या मार्गावर जाऊ लागले तसे यवनकृष्ण ओडीसिअसने त्यांना गोष्टी युक्तीच्या चार सांगून परत फिरविले. थर्सितेससारखा एक किरकिरा शिपाईही त्याने गप्प बसविला आणि सर्वजण उत्साहाने युद्धावर निघाले. मागे सांगितल्याप्रमाणे कॅटॅलॉग ऑफ शिप्समध्ये कोणत्या योद्ध्याचे किती सैनिक, किती जहाजे ही सर्व आकडेवारी त्यात आलेली आहे. ट्रोजन वीरांमध्ये एनिअस, टेक्टॉन, ग्लॉकस, मेम्नॉन, सार्पेडन आणि हेक्तर हे मुख्य लोक होते. ग्रीकांच्या तयारीचा वास येताच ट्रोजनांनीही तयारी सुरू केली.

     दुसर्‍या दिवशी, दोन्ही सैन्ये एकमेकांसमोर उभी ठाकली. होमरच्या म्हणण्यानुसार, जवळपास सगळे मिळून लाख-दीड लाखाचे तरी ग्रीक सैन्य असेल. ट्रोजन सेनेचा आकार तितका अचूक दिलेला नाही, पण यापेक्षा लै काही लहान असेल असेही वाटत नाही. सगळे एकत्र जमल्यावर हेक्टरने घोषणा केली, की उगा बाकीच्यांनी लढण्याऐवजी हेलेनच्या दोन दादल्यांनी आपसात काय ते भांडून भुस्काट पाडावे, त्यांच्या वैयक्तिक लढाईत जो विजेता होईल, त्यालाच हेलन मिळेल.

     हेलेनचा नवरा मेनेलॉसला तेच तर पाहिजे होते. इकडे पॅरिसची मात्र वाईट तंतरली होती. मग हेक्टरने त्याला चार शिव्या घातल्या, मर्दानगीची आठवण करून दिली, आणि लढायला पाठवले. पण हा पॅरिस जरा लढाईत कच्चाच असावा, मेनेलॉसच्या तलवार-भाल्याचे वार चुकवता चुकवता त्याच्या नाकी नऊ आले आणि अखेरीस कुठूनतरी खोपचीतून तो सटकला. होमरबाबांनी इथेही व्हीनस देवीला मध्ये आणले आहे. व्हीनसची कृपा असल्यामुळेच पॅरिस सुटला, नैतर त्याचे काही खरे नव्हते.

     इकडे हेक्टर-पॅरिसचा बाप, ट्रॉयचा राजा प्रिआम हा ट्रॉयच्या भुईकोटाच्या तटावरून युद्ध बघत होता. हेलेनसाठी चाललेले युद्ध बघण्यासाठी मुद्दाम त्याने तिला पाचारण केले. तिलापण कळूदे काय ते, अशी भावनाही असेल त्यामागे, कुणी सांगावे? इकडे हेलनची मनःस्थिती द्विधा झाली होती. कधी पॅरिस हवाहवासा वाटे, तर कधी मेनेलॉस.पॅरिस तिथून पळून आल्यावर हेलनने त्याला पळपुट्या वगैरे शिव्या घातल्या, पण ती इतकी भारी दिसत होती की पॅरिसला अनंगशराने विद्ध करायचे ते केलेच ;)

     हा झाला इलियडमधील सुरुवातीचा काही भाग. पुढील कथाभाग येईल लवकरच :)

--बॅटमॅन
(February 19, 2013)
-----------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                     ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.02.2023-मंगळवार.
=========================================