मायबोली-लेख क्रमांक-19-अर्धा-दशक लहान बायको - भाग १-ब--

Started by Atul Kaviraje, February 17, 2023, 10:59:38 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "मायबोली"
                                   लेख क्रमांक-19
                                  ----------------
                                       
मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मायबोली", या शीर्षकI-अंतर्गत, एक सामाजिक लेख. या लेखाचे शीर्षक आहे-"अर्धा-दशक लहान बायको - भाग १"

                         अर्धा-दशक लहान बायको - भाग १--ब--
                        -----------------------------------

     पुढे पारिवारिक पातळीवरच्या वाटाघाटी सुरु झाल्या. एखादी कंपनी समोरच्या क्लायंटने आपल्या बरोबर बिझनेस करावा म्हणून तो म्हणतो ते सगळे जसे ऐकते तसे माझ्याकडचे करत होते. त्या साऱ्या संभाषणात मला एवढेच शब्द ऐकू आले - 'मुलगी पसंत आहे'
" पण तुम्हाला वयाबद्दल काही म्हणायचे नाही ना? म्हणजे ... तुमचा मुलगा २८ वर्षांचा आणि आमची मुलगी २२ वर्षांची ... ", मुलीकडल्यांकडून एक शेवटचा प्रश्न आला.
"नाही हो", आईने सूत्र हातात घेतली. "आपल्या पिढीला कुठे त्रास झाला? आणि हे आता वाटते हो ... पुढे एकदा पस्तीशी वगेरे ओलांडली की दोघेही एकाच लेव्हल वर येतात."
ह्या घरातले सगळे आता माझे नातेवाईक झाले होते.

     लवकरात लवकर लग्न झालं पाहिजे असे संकेत मला आधीच मिळाले होते. ते संकेत समोरच्या पक्षाला दिले गेले. समोरच्या पक्षाचे प्रतिनिधी आणि आमचे प्रतिनिधी हे प्रत्येक निर्णय घेण्याआधी वाटाघाटी करायचा आव आणायचे. परंतु समोरचे प्रतिनिधी एकच वाक्य पाठ करून आले होते. 'आमची काही हरकत नाही' ह्या त्यांच्या ठरलेल्या वाक्याने चर्चा संपायची. त्यामुळे लग्नात ज्या पक्षाची बाजू वरचढ ठरते तो 'वर' पक्ष असे मला लहानपणापासून वाटायचे ते काही अगदी खोटे नव्हते ह्याची प्रचीती मला माझ्याच लग्नात येत होती. आणि ३० डिसेंबर २०१४ ही तारीख ठरली. माझ्या बऱ्याच मित्रांनी सुटकेचा निःश्वास टाकला. ३१ डिसेंबर नाही निवडली म्हणून! ( माझ्यासाठी नव्हे!).

     बाकी माझी एकूण घडण ही इतकी नीरस का झाली आहे हे मला सांगता येत नाही. म्हणजे आयुष्यातल्या एका दिवसासाठी चेहरा गुळगुळीत करणे, त्यावर रंगकाम करणे हे आपण का करतो असा मला प्रश्न पडला. अजूनही त्याचे उत्तर मिळाले नाही. त्या एका दिवसासाठी घेतलेल्या कपड्यांचे पुढे काय झाले हे आता मला चांगलेच माहिती आहे. परंतु तरीही असे करावे लागते. आणि ह्याचे उत्तर 'असे करावे लागते' असेच असते! त्यात पुन्हा आपण त्यांच्यासाठी आणि त्यांनी आपल्यासाठी केलेली खरेदी असते. मग दोन्ही बिलांची घरातल्या गप्पांमध्ये होणारी तुलना आणि आपण दिलेलंच सरस हे ठरवायचा आटापिटा! आणि ह्या साऱ्यात रस दाखवला नाही तर 'पुढे तुझे कसे होणार' ह्याबद्दल व्यक्त होणारी चिंता. एकूण काय तर लग्न ह्या घटनेनंतर आयुष्यात प्रचंड बदल होणार आहे असे उगीचच सांगितले जाते. तसं काही होत नाही हे अर्थात काही आठवड्यांच्या कालावधीत समजतच. ही अवस्था म्हणजे आपल्याला पोहायला जाताना पाण्यात बुडू नाही म्हणून अगदी पाठीला डबा बांधायचा आणि उडी मारल्यावर खोली ३ फुटाची आहे असे समजण्यासारखे असते. पण ह्या साऱ्या गोंधळात खरेदी वगेरे वैताग देणाऱ्या प्रक्रियेत मित्स कधी कधी आमच्या बरोबर असायची.

--आशय गुणे
(2 October, 2015)
--------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायबोली.कॉम)
                     ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.02.2023-शुक्रवार.
=========================================