II निबंध-लेखमाला II-मी पाहिलेला अपघात

Started by Atul Kaviraje, February 18, 2023, 10:41:13 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II निबंध-लेखमाला II
                                --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आजपासून, निबंध-लेखमाला सुरु करीत आहे, निबंध-लेखमाला या मथळयI-अंतर्गत, सादर करीत आहे, (निबंध क्रमांक-6), आजच्या निबंधाचे शीर्षक आहे- "मी पाहिलेला अपघात"

     आपल्या दैनंदिन जीवनात अनेक प्रकारच्या घटना, प्रसंग आपण अनुभवत असतो. वाढत्या लोकसंख्येमुळे वाहनांची संख्या अतिशय वाढली आहे, त्यामुळे अनेक अपघात रोज होत असतात. अशाच एका अपघाताचे वर्णन ह्या लेखामध्ये केले गेले आहे. ह्या लेखामध्ये आम्ही "मी पाहिलेला अपघात" ह्या मराठी विषयावर निबंध, लेख, भाषण, प्रसंग लेखन दिले आहे. हि मराठी माहिती तुम्हाला शाळेमध्ये गृहपाठ तसेच निबंध, वक्तृत्व स्पर्धेमध्ये "मी पाहिलेला अपघात" ह्या मराठी विषयावर निबंध, लेख, भाषण, प्रसंग लेखन लिहण्यास मदत करेल.

     गणेशोत्सव चालू होता. प्रत्येक मंडळाने अगदी सुंदर असे देखावे सादर केले होते. ही सुंदर आरास पाहण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून गेलो होतो. रस्ता माणसांनी अगदी फुलला होता. रस्त्यावर पाहू तिकडे माणसेच दिसत होती. सगळीकडेच हे देखावे पाहण्यासाठी गर्दीच गर्दी जमली होती.

     इतक्यात भरधाव जाणाऱ्या जीपच्या ब्रेक्सचा कर्कश आवाज कानी पडला. लगेच आमच्या सर्वांच्याच नजरा तिकडे वळल्या. आम्ही सर्वजण धावत तेथे गेलो. अरेरे एका छोट्या मुलालाट्या जीपने धडक दिली होती. ते दृश्य पाहून माझे मन सुन्न झाले होते. सुदैवाने त्या मुलाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली नव्हती. त्याच्या डोक्याला खोच पडली होती त्यातून भळाभळा रक्त वाहत होते. त्याच्या हातापायाला खरचटले होते. अगदी एकाएकी घडलेल्या या गोष्टीमुळे तो छोटा मुलगा प्रचंड घाबरला आणि बेशुद्ध झाला होता.

     लोकांनी तिथे रस्त्यावर एकच गलका केला होता. त्यामुळे आजूबाजूचे लोक अपघातस्थळी धावत आले. पोलिसांना बोलवा, रुग्णवाहिका बोलवा असे लोक बोलत होते, पण प्रत्यक्ष कृती मात्र कुणीच करत नव्हते. त्या मुलाला प्रथम हॉस्पिटलमध्ये नेणे आवश्यक होते. आम्ही मित्रांनी त्याच जीपमध्ये त्या मुलाला अलगदपणे ठेवले. त्याच्या आईला आम्ही धीर दिला. आणि त्याच्या आईलाही आम्ही जीपमध्ये हॉस्पिटलला घेऊन गेलो.

     हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी मुलाला तपासले. त्याची डोक्याची जखम धुवून त्यावर मलमपट्टी केली. एक इंजेक्शन दिले, थोड्याच वेळात तो मुलगा शुद्धीवर आला, तेव्हा त्याची आई शांत झाली. आम्हालाही तेव्हा खूप बरे वाटले. इतक्यात पोलीस तेथे आले. त्यांनी रीतसर चौकशी केली. आम्ही दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पोलिसांनी आम्हाला शाबासकी दिली. मग डॉक्टरांनी मुलाला घरी नेण्यास सांगितले.

     आमचे आभार मानताना त्या मुलाच्या आईचे डोळे भरून आले होते. त्या आईचा अपघात झाला तेव्हाचा आक्रोश अजूनही आमच्या कानावर येत होता व त्या मुलाचा चेहरा डोळ्यासमोर दिसत होता. या अपघातामुळे एक गोष्ट मात्र जाणवली की, रस्ता क्रॉस करताना रस्त्यावरील वाहने पाहून रस्ता ओलांडावा. म्हणजे असे अपघाताचे प्रसंग टळतात. मी तो अपघात कधीच विसरू शकत नाही.

--अजय चव्हाण
--------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-कॅम्पस जुगाड.कॉम)
                    --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.02.2023-शनिवार.
=========================================