मायबोली-लेख क्रमांक-20-अर्धा-दशक लहान बायको - भाग १

Started by Atul Kaviraje, February 18, 2023, 10:53:48 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "मायबोली"
                                  लेख क्रमांक-20
                                 ---------------
                                       
मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मायबोली", या शीर्षकI-अंतर्गत, एक सामाजिक लेख. या लेखाचे शीर्षक आहे-"अर्धा-दशक लहान बायको - भाग १"

                          अर्धा-दशक लहान बायको - भाग १--
                         -------------------------------

     मित्स म्हणजेच माझी बायको. तिचे नाव मिताली. परंतु ' एवढे मोठे नाव' कुठे घेत बसायचे म्हणून मला सगळे मित्स म्हणतात असं मला लग्न ठरल्याच्या काही दिवसातच सांगितले गेले होते. वर, आमच्या ग्रुप मध्ये आम्ही सर्वांना अशी नावं ठेवली आहेत असं देखील मला सांगण्यात आलं होतं. मला आठवलं की आमच्या कॉलेज मध्ये काही उत्साही मुलींनी असा प्रकार करायचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांनाच सर्वांनी नावं ठेवल्यामुळे त्यांनी हा नाव ठेवण्याचा प्रयत्न बाजूला ठेवला! परंतु आता मला हेच नाव वापरावे लागणार होते. असो.

     लग्नाची खरेदी होत असताना नुसता मी आणि माझा परिवारच नाही तर अख्खं जग त्यात सामील होतंय असं मला काही दिवसात जाणवू लागलं. रिसेप्शनसाठी शर्ट घेताना अचानक माझा मोबाईल वाजला. मोबाईल बघितला तर शर्ट हातात घेऊन त्याच्याकडे बघतानाचा माझा फोटो मला फेसबुक वर दिसला. माझ्या होणाऱ्या बायकोने मला तेवढ्यात tag केले होते. आणि तो फोटो अपलोड करून २ मिनिटं ही झाली नाही तर त्यावर चार उत्साही मुला-मुलींचे कमेंट आले होते. 'हे माझे ग्रुप-मेट्स. नेहमी ऑनलाईन असतात' हे वाक्य माझ्या कानावर पडले. आणि पुढील दोन ते तीन दिवस माझ्या नकळत माझे बरेच फोटो फेसबुक वर येऊ लागले. आणि त्यामुळे माझे ऑफिसातले सहकारी आणि माझे इतर मित्रही प्रत्येक खरेदी बद्दल विचारायला लागले. शेवटी सुरुवातीला विनंती आणि नंतर विनवण्या करून मी तिला हा सारा प्रकार थांबवायला सांगितला. आणि लग्ना नंतर पुढे आयुष्यभर जे करायला लागणार होतं ( आणि आता करायला लागतंय) ह्याचा माझा सराव सुरु झाला. तिने देखील, नाखुशीने का होईना, पण हे सगळं थांबवलं. परंतु फेसबुकचा उल्लेख अधून मधून होयचा. म्हणजे एखादा शर्ट घेताना ' हा फेबुकवर छान दिसेल' अशी प्रतिक्रिया यायची. क्वचित कधीतरी फेसबुक स्टेटस मध्ये मी tagged असायचो. पण जेव्हा 'thinking about someone special' ह्या स्टेटस मध्ये मला tag केले गेले तेव्हा मात्र मी हे देखील थांबवायला सांगितले आणि माझ्या नीरस असल्याबद्दल पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले!

     आणि शेवटी लग्नाचा दिवस उजाडला. इतके दिवस मित्राचे किंवा मैत्रिणीचे लग्न होताना त्याला/तिला ज्या गोष्टीसाठी हसायचो ती गोष्ट आज मला करायला लागणार होती. स्टेजवर वेळेचे ओझे डोक्यावर घेऊन येणाऱ्या सर्वांकडे बघून हसायचे होते आणि त्यांच्या बरोबर फोटो काढायचे होते. ह्यावर भर घालायला माझे काही मित्र ' आम्ही जेऊन घेतो' हे मुद्दाम सांगत होते.हे सगळं सुरु असताना साधारण ८ ते १० मुलामुलींचं टोळकं स्टेज चढून वर आलं. औपचारिक ओळख झाल्यावर असं कळलं की हा हिचा कॉलेजचा ग्रुप आहे. त्यांची ओळख आणि त्यांनी आमचे अभिनंदन केल्यावर फोटो काढायची वेळ आली आणि मला जवळ जवळ पन्नासाव्या वेळेस हसायची संधी मिळाली. त्यात अजून एकदा हसायची भर पडली जेव्हा त्यातील एकाने आपला मोबाईल बाहेर काढला आणि त्यावर आमचा सर्वांचा एक फोटो घेतला. आणि तेवढ्यात त्यातील एकाने सर्वांना थांबायची खूण केली. स्टेजच्या डाव्या बाजूला जो ग्रुप पुढे यायला व्याकूळ होता तो अधिक व्याकूळ झाला. क्षणभर कुणाला काही कळेना. ज्याने थांबायची खूण केली त्याने हातात काठी सारखं काहीतरी घेतलं. आणि दुसऱ्या क्षणी तिला ताणून लांब केले. आणि अगदी टोकावर स्वतःचा मोबाईल अडकवला. आणि गुढी उभारण्याच्या पोझ मध्ये ते सारे एका हातात धरले. त्या सबंध घोळक्यात मीच एकटा संभ्रमित दिसत होतो. आणि कानाला कांठळ्या बसाव्यात अशा आवाजात त्यातील तीन जणं ओरडले -- " सेल्फ़ीssssssss"

     मला सेल्फी काय आहे ते माहिती होतं. परंतु त्यासाठी देखील यंत्र उपलब्ध आहेत ह्याची माहिती मला नव्हती. लग्नात मला जी काही लोकं भेटायला आली त्यांच्यापैकी सेल्फीचा आग्रह मात्र ह्याच ग्रुप ने धरला होता. इतर बरीच लोकं येत होती. काही परिचित, काही अपरिचित आणि बरीचशी त्या वेळेपूर्ती परिचित! आता हेच बघा ना. मित्सच्या पुण्यातील एका काकांचे ज्येष्ठ मित्र आम्हाला भेटायला स्टेज वर आले. साधारण सत्तरी जवळ आलेल्या ह्या व्यक्तीची ओळख 'मंगळूरला असतात आणि बऱ्याच वर्षांनी पुण्यात आले आहेत' अशी झाली. आता हे काका पुण्यातच बऱ्याच वर्षांनी आले होते तर ते पुढे मुंबईला कधी येतील आणि आलेच तर आमच्या घरी कधी येतील हा प्रश्नच होता म्हणा! पण हाच तो तात्पुरता परिचय आणि लग्नात नेमकी ह्या अशाच लोकांची संख्या सर्वाधिक असते! माझ्यात मात्र स्टेज वर उभं राहून राहून दूरदृष्टी निर्माण झाली होती. म्हणजे आतापर्यंत मला आपण काही तासांनी जेवणार आहोत असे दिसू लागले होते. मात्र आता मी उद्या विमानात बसलो आहे, केरळला जाणारे विमान, त्या विमानात एयर-हॉस्टेस कशा असतील .... आणि एकदम " हे आपटे साहेब", असं म्हणत सासरेबुवांनी कुणाला तरी समोर उभे केले!

--आशय गुणे
(2 October, 2015)
--------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायबोली.कॉम)
                       ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.02.2023-शनिवार.
=========================================