आईशप्पथ

Started by डॉ. सतीश अ. कानविंदे, February 23, 2023, 08:05:16 PM

Previous topic - Next topic
       आईशप्पथ

आईशप्पथ दिसली मला
आकाशातली म्हातारी
खात होती पुढ्यात घेऊन
कंदी पेढे सातारी

एका हाताने मोठं जातं
फिरवित होती गडागडा
बर्फ घेऊन दळत होती
आवाज करीत कडाकडा

चमकत होती वीज आणि
खाली पडत होत्या गारा
पाऊस सुद्धा आला होता
सोबत घेऊन सुसाट वारा

आकाशातल्या म्हातारीचे
कंदी पेढे संपले खाऊन
जातं थांबलं नी कडाडणारी
वीज बसली कोपऱ्यात जाऊन

शांत झाला सुसाट वारा
कोसळणारा थांबला पाऊस
आई म्हणाली "शाळेत जा रे
आज नको घरी राहूस"

- डाॅ. सतीश अ. कानविंदे