मायबोली-लेख क्रमांक-25-प्रयत्ने स्थळ शोधिता - भाग २

Started by Atul Kaviraje, February 23, 2023, 09:54:05 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "मायबोली"
                                   लेख क्रमांक-25
                                  ---------------
                                       
मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मायबोली", या शीर्षकI-अंतर्गत, एक सामाजिक लेख. या लेखाचे शीर्षक आहे-"प्रयत्ने स्थळ शोधिता - भाग २"

                            प्रयत्ने स्थळ शोधिता - भाग २--
                           --------------------------

     आणि दुसऱ्याच दिवशीपासून मला ह्या वेबसाईटचा मला मुलगी शोधून देण्याचा प्रयत्न लक्षात आला. मला मुलगी कोणत्या वयोगटातील अपेक्षित आहे ह्याची माहिती मी त्यांना आधीच दिली होती. त्याप्रमाणे रोज दोन इ-मेल मला येऊ लागले. एका इ-मेल मध्ये मला आठ ते नऊ मुली दिसायच्या. ह्या मुली त्यांच्यामते मला अनुरूप ( match) होत्या. अहो, एक ठीक पण नऊ मुली मला एकाच दिवशी अनुरूप कशा असतील? पण आपण आता choose from the display ह्या इंटरनेटच्या विश्वात आलो आहोत ह्याचा मला साक्षात्कार झाला. आणि असे असून सुद्धा मी त्या नऊ च्या नऊ मुली उत्सुकतेने न्याहाळू लागलो. मुलीचे फोटो इंटरनेट वर पहायची अधिकृत संधी फुकट कोण घालवेल? शिवाय हे फोटो पाहणं एका चांगल्या उद्देशासाठीच होतं की! काही दिवसांनी 'आज कुणाचा फोटो बघायला' मिळतोय अशी देखील माझी अवस्था झाली होती आणि हे नाकारण्याचे काहीच कारण नाही. ह्या व्यतिरिक्त अजून एक इ-मेल मला रोज यायचा. तो म्हणजे अमुक एक मुलगी माझी photo match आहे असे सांगणारा इ-मेल. आता मी मुलगा आणि ती मुलगी एवढा साधा-सरळ नैसर्गिक फरक असताना मी कुण्या एका मुलीचा photo match कसा होऊ शकतो हे मला कळेना! ह्या मेल मध्ये मात्र एकाच मुलीचा फोटो असायचा. थोडक्यात काय, तर मला ह्या मुलींमध्ये उत्सुकता निर्माण व्हावी आणि मी एक पाऊल पुढे टाकावं ह्या आस्थेने ते 'वेबसाईट' हे सृजनकार्य करत होतं. एक पाऊल पुढे म्हणजे 'तुम्हाला ह्या मुलीमध्ये आवड निर्माण झाली आहे का' ह्या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही असे द्यायचे! पण जुन्या सवयी जाता जात नाहीत. शिवाय त्या लहानपणीच्या असल्या तर नाहीच नाही! आता लहानपणापासून मुली फक्त पाहत आलो असल्यामुळे पाय जमीनीवरच घट्ट रोवलेले असायचे. त्यामुळे पुढचं पाऊल टाकण्याचा प्रश्नच नव्हता! साहजिकच इथेही तेच झाले.

     शेवटी मग माझ्याकडून काहीच हालचाल होत नसल्याने त्या वेबसाईट वाल्यांनी माझी चौकशी करायला मला फोन करायला सुरुवात केली.
" सर, आम्ही पाहतोय की तुम्ही फक्त प्रोफाईल सुरु करून ठेवली आहे. परंतु तुम्ही निष्क्रिय दिसता आहात", त्यांनी विचारले.
" हो... म्हणजे नाही ... मला रोज ई-मेल येतात आणि त्यात माझ्या match चा उल्लेख असतो. मी ते पाहतो", मी उत्तर दिले.
" सर, पण तेवढं करून कसं चालेल? ( ही बाई अगदी माझी समजूत काढल्यासारखी बोलत होती!) तुम्हाला जर पुढे तुमची पसंती पाठवायची असेल तर तुम्हाला त्या मुलीला इ-मेल करावे लागेल, तिला फोन करावा लागेल. ते तुम्ही कसं करणार?"
"म्हणजे?"

     " सर, त्यासाठी तुम्हाला आमचा paid member व्हावे लागेल. त्याची किंमत अमुक अमुक हजार आहे...", ती अगदी गोड आवाजात सांगत होती. ह्या साऱ्या प्रकारात मी paid membership चा विचारच केला नव्हता. त्यात काही विशेष नाही म्हणा कारण पुढे देखील करणार नव्हतो! मला जवळ जवळ एक महिना विचार करायला लागेल असे मी तिला सांगितले.

--आशय गुणे
(20 October, 2014)
----------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायबोली.कॉम)
                     ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.02.2023-गुरुवार.
=========================================