मायबोली-लेख क्रमांक-30-प्रयत्ने स्थळ शोधिता - भाग २

Started by Atul Kaviraje, February 28, 2023, 10:33:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "मायबोली"
                                     लेख क्रमांक-30
                                    ---------------
                                       
मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मायबोली", या शीर्षकI-अंतर्गत, एक सामाजिक लेख. या लेखाचे शीर्षक आहे-"प्रयत्ने स्थळ शोधिता - भाग २"

                             प्रयत्ने स्थळ शोधिता - भाग २--
                            --------------------------

     स्थायिक होण्याचे ठिकाण 'पुणे किंवा अमेरिका' (!) असे आढळले की आपण ह्या अप्रत्यक्ष इशाऱ्याला समजून जायचे! ह्या संदर्भातील एक 'भयंकर' अपेक्षांची मागणी करणारी परंतु तेवढीच संभ्रमात असलेली प्रोफाईल माझ्या नजरेत आली आणि आपण ह्या साऱ्या प्रकाराकडे विनोदाच्या दृष्टीने देखील पाहू शकतो अशी प्रेरणा मला देऊन गेली.
आम्ही आमच्या बहिणीसाठी एक स्थळ शोधतोय. मी अमेरिकेत राहते आणि माझी चुलत बहिण फ्रान्सला राहते. सुदैवाने आम्ही दोघी पी.एच.डी झालेल्या मुलांशी विवाहबद्ध आहोत. त्यामुळे तुम्ही कल्पना करू शकता की आम्ही एका उच्चशिक्षित मुलाची अपेक्षा करतो आहोत. परंतु ही आमची अट नाही. आम्ही देशाबाहेर राहणाऱ्या मुलाची अपेक्षा करतो आहोत. परंतु ही आमची अट नाही. आम्ही मध्य महाराष्ट्रातल्या एका प्रतिष्ठित आणि लिबरल परिवारातील मुली आहोत. त्यामुळे आम्हाला आमच्याच पोट-जातीतील मुलगा अपेक्षित आहे. त्यामुळे इतर सदस्यांनी इथे पसंती दर्शवू नये! धन्यवाद! आणि ह्या मागण्यांवर शिक्कामोर्तब करीत त्यांनी प्रत्येक देशातील चलनाची आकडेवारी देत पगाराची मागणी केली होती. त्यांना पंधरा ते वीस लाख प्रति वर्ष भारतीय रुपये, चाळीस हजार ते एक लाख इंग्लंडचे पौंड, दोन लाख चाळीस हजार ते तीन लाख सत्तर हजार प्रति वर्ष अरबी दिनार, ऐंशी हजार ते दीड लाख ऑस्ट्रेलिया डॉलर आणि ऐंशी हजार ते दीड लाख अमेरिकन डॉलर ह्यांच्यापैकी कोणतीही 'परिस्थिती' मान्य होती. आणि शेवटचे गणित होते पन्नास लाख ते एक करोड प्रति वर्ष ह्या चलनाचे. चलन होते 'PKR'. गुगल सर्च केल्यावर अर्थ उलगडला - पाकिस्तानी रुपये!!! म्हणजे ह्या मुलीची पाकिस्तानला जायची पण तयारी होती! परंतु पुणे सोडून मुंबई किंवा नागपूरला जायची तयारी नव्हती.

     पुढे काही दिवसांनी मला काही पसंती दर्शविणारे प्रस्ताव आले. वरील त्रुटी नसलेल्या देखील काही प्रोफाईल होत्या. स्वतःबद्दल वस्तुस्थिती दर्शविणाऱ्या, मतं व्यवस्थित मांडणाऱ्या आणि स्पष्ट, योग्य अपेक्षा सांगणाऱ्या ह्या प्रोफाईल्स होत्या. त्यामुळे मी काहींना पसंती पाठवली. आणि ही प्रक्रिया सुरु झाली. परंतु कधी मी प्रस्ताव नाकारायचो तर कधी तिकडून नकार यायचा. ह्याची बरीच कारणं होती अर्थात. कधी कोणत्या मुलीला तिच्या नोकरीमुळे मुंबईत येणे शक्य नसायचे तर कधी लग्न लवकर करायचे कारण असायचे जे अर्थात मला नको होते. आणि एके दिवशी एक प्रस्ताव चालून आला. मुंबईचीच मुलगी होती. रसिका नावाची. स्वतःबद्दलचा मजकूर नीट लिहिलेला, स्पष्ट मतं मांडलेली आणि अपेक्षा बऱ्यापैकी नोंदवलेल्या. प्रोफाईल वाचून माझे प्राथमिक समाधान झाले आणि मी पसंती परतवून भेटण्याचे निश्चित केले.

     वाशीचा इनओर्बिट मॉल हे भेटण्याचे ठिकाण ठरले. आम्ही एकमेकांचे नंबर घेतले होतेच. तिची नोकरी ही वाशीत असल्यामुळे आणि मला देखील ते शक्य असल्यामुळे आम्ही भेटायचे ठरवले. वॉट्सएप वर आधी थोडे बोलणे झाले होते. परंतु तेव्हा आपण एका अशा मुलीशी बोलतो आहोत जी आपली कदाचित बायको होऊ शकेल ह्यावर विचार करणे जड जात होते. संध्याकाळी साडे सहाला आम्ही तिथल्या कॉफी शॉप मध्ये कॉफी मागविली आणि गप्पा सुरु केल्या. काय करतेस, कसा होता आजचा दिवस, निघायला उशीर होणे, बॉस चांगला/वाईट, घरी जायला उशीर वगेरे विषय हाताळले गेले. हे विषय बोलताना असे अजिबात वाटत नव्हते की दोन अनोळखी लोक पहिल्यांदा बोलत आहेत. नेहमीचंच कुणीतरी बोलतंय असं वाटत होतं. परंतु मध्येच असे जाणवायचे की आपण इथे ह्या मुलीशी लग्नासाठी बोलायला म्हणून आलो आहोत आणि ही कदाचित आपली बायको होऊ शकेल. तेव्हा मात्र तो विचार झटकून टाकावासा वाटायचा! शेवटी मी स्वतः विषय सुरु केला. नाहीतर गप्पांची गाडी थांबलीच नसती.

     "मग.... लग्नाबद्दल तुझे काय विचार आहेत? तू ह्या कल्पनेकडे कशी बघतेस?"
मला वाटत नाही माझा प्रश्न फार अवघड होता. परंतु तिच्याकडे काही विशेष उत्तर नव्हते ह्या प्रश्नाचे. म्हणून तो प्रश्न माझ्याकडे परतवला गेला.

--आशय गुणे
(20 October, 2014)
----------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायबोली.कॉम)
                      ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.02.2023-मंगळवार.
=========================================