प्रतिबिंब

Started by mkapale, March 01, 2023, 09:11:34 AM

Previous topic - Next topic

mkapale

जग खरं आहे जितकं ते असू शकते
तसे तर प्रतिबिंब देखील काही क्षण जुने असते
पाणी आत तर कोणी म्हणते बाहेर जातंय
लाट म्हणजे केवळ पाण्याचे हिंदोळे असते

सत्य आणि खरं ह्यात फरक आहे जाणिवेचा
सूर्य ढळला हे खरं पण तो अजूनही आहे हे सत्य
ह्या दोन शब्दांच्या मध्ये आपण ओळखतो इतरांना
चांगलं, वाईट ह्यात भाकीत जास्त , असते कमी तथ्य

रक्ताच्या थारोळ्यात पडलेले जवान दोन्हीकडे
त्यांचे शौर्य सत्य कि त्यांना विभागणारी तटबंदी
माणुसकी टिकवायला त्यांनाच वेगळं..का करतात
भुकेल्या जीवांची संख्या वाढतांना...शस्त्रांची खरेदी

जयघोष करता करता ढकलती भक्त बाजूला
माणसं वाचायची सोडून ग्रंथ पारंगत होणारे
श्रध्दा आणि शस्त्रांच्या बाजारात विकतात रोज
सामान्य माणसांच्या प्रगतीच्या स्वप्नांचे डोलारे

कोणाचे कोणाला कळलेले सत्य कि भास
समाज्याच्या प्रतिबिंबातून दिसलेला चेहेरा
विचार करून पहा व्यक्ती आहे कि त्याची प्रतिमा
खरी ओळख होणे हाच जीवनाचा खेळ आहे गहिरा....