कुमार मराठी विश्वकोश-अंबर (Amber)

Started by Atul Kaviraje, March 06, 2023, 10:51:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "कुमार मराठी विश्वकोश"
                                -----------------------


मित्र/मैत्रिणींनो,

     "कुमार मराठी विश्वकोश", या विषया-अंतर्गत आज वाचूया कुमारांसाठी एक महत्त्वाचा शैक्षणिक लेख. या लेखाचा विषय आहे- अंबर (Amber).

                                  "अंबर (Amber)"
                                 ------------------

     जीवाश्माच्या रूपाने आढळणा-या प्रामुख्याने अनावृतबीजी वृक्षांच्या राळेला अंबर म्हणतात. अंबर हा कठिण, पिवळ्या रंगाचा कार्बनी पदार्थ आहे. अनावृतबीजी वृक्षामधील राळ तेलमिश्रित चिकट पदार्थाच्या स्वरूपात असते. त्यातील तेलाचे ऑक्सिडीभवन झाल्याने राळ घट्ट स्वरूपात मागे राहते. हे सूचिपर्णी वृक्ष जमिनीत अथवा पाण्यात गाडले जाऊन अंबराची निर्मिती झाली. पुराजीवविज्ञान आणि भूविज्ञानाच्या दृष्टीने अंबराचा अभ्यास महत्त्वाचा आहे. तृतीय कल्पातील गाळांच्या काही खडकांत अनियमित आकाराच्या अंबराच्या लहान-मोठ्या गुठळ्या किंवा कांड्या सापडतात. अंबराचे मोठे साठे बाल्टिक समुद्रकिनाऱ्यालगतच्या खडकात आहेत. त्यांतील अंबर खणून बाहेर काढतात. काही वेळा वादळामुळे खडकातील अंबर बाहेर पडते. अंबराचे सर्वाधिक उत्पादन बाल्टिकलगतच्या प्रदेशात होते. याशिवाय अमेरिकेची संयुक्त संस्थाने, म्यानमार, लेबानन, रुमानिया, इटली, मेक्सिको, कॅनडा, जपान, न्यूझीलंड, इ. देशांतील खडकांत काही प्रमाणात अंबर आढळते.

                 अंबरामध्ये अडकलेले कीटक--

     अंबरात जीवाश्मांचे नमुने असल्यामुळे पुराजीवशास्त्रज्ञ अंबराचे संरक्षण करतात. मूळच्या वृक्षातून बाहेर पडणाऱ्या चिकट डिंकासारख्या पसरणाऱ्या द्रवात आकस्मिकपणे अडकलेल्या गतकालीन कीटकांचे जीवाश्म अंबरात कधीकधी आढळतात. सु. ११००० वर्षांपासून मणी, दागिने व शोभेच्या वस्तू बनविण्यासाठी अंबर उपयोगात आणले जात आहे. औषध व ताईत बनविण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असे. आजही रत्ने   बनविण्यासाठी अंबराचा उपयोग केला जातो. अनेक देशात अंबराच्या बारीक तुकड्यांचा उपयोग व्हार्निश (रोगण) टणक करण्यासाठी केला जातो.

     स्वच्छ पारदर्शक किंवा दुधी काचेप्रमाणे पारभासी असलेल्या अंबरालाच किंमत येते. अंबर अस्फटिकी आणि रंगाने पिवळे, नारिंगी, तपकिरी, क्वचित निळे किंवा हिरव्या रंगाचे असते. अंबर घासले असता स्थितीक-विद्युत निर्माण होते. सध्याचा इलेक्ट्रॉन हा शब्द १८९४ मध्ये ग्रीक भाषेतील अंबर अर्थाच्या 'Elektron' या शब्दापासून घेतला आहे. निरनिराळ्या प्रदेशातील अंबराच्या रासायनिक घटकांमध्ये थोडाफार फरक असतो. बाल्टिक अंबराला सक्सिनाइट  असेही म्हणतात. त्यात सक्सिनिक आम्ल असते. हे आम्ल इतर अंबरांत आढळत नाही.

======================
अंबर (Amber)
Post published:16/07/2019
Post author:नरेंद्र देशमुख
Post category:कुमार विश्वकोश / वनस्पती
======================

--मराठी विश्वकोश
----------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-कुमार मराठी विश्वकोश)
                   ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.03.2023-सोमवार.
=========================================