कुमार मराठी विश्वकोश-अक्कलकारा (Pellitary)

Started by Atul Kaviraje, March 08, 2023, 10:48:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "कुमार मराठी विश्वकोश"
                                 -----------------------


मित्र/मैत्रिणींनो,

     "कुमार मराठी विश्वकोश", या विषया-अंतर्गत आज वाचूया कुमारांसाठी एक महत्त्वाचा शैक्षणिक लेख. या लेखाचा विषय आहे- अक्कलकारा (Pellitary).

                                "अक्कलकारा (Pellitary)"
                               --------------------------

     अक्कलकारा ही कंपॉझिटी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव स्पायलँथिस ऍक्मेला आहे. ही औषधी वनस्पती भारत, श्रीलंका व फिलिपीन्स या देशांत आढळते. बागेतही ही वनस्पती लावतात

     ही वनस्पती साधारणपणे 20 – 50 सेंमी. उंचीची असते. या वनस्पतीचे खोड व फांद्या केसाळ असतात. पाने साधी असून समोरासमोर, अंडाकृती, दातेरी व देठाकडे निमुळती असतात. फुलांची लंबगोल, पिवळट लाल स्तबके नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात येतात. यामध्ये भोवतालची किरण-पुष्पके स्त्रीलिंगी व मधली बिंब-पुष्पके द्विलिंगी असतात.

     फुलांना झोंबणारा वास असून त्यांची चव तिखट असल्यामुळे चघळल्यास लाळ सुटते. जिभेच्या विकारावर ही फुले उपयुक्त आहेत. काही ठिकाणी स्त्रियांना प्रसूतीनंतर देतात. पुरळ उठून खाज सुटल्यास पाने अंगास चोळतात. तोंडास कोरड पडल्यास बिया चघळतात. अनेक देशांत आमांशावर औषध म्हणून ही वनस्पती पाण्यात उकळून देतात. रेचक म्हणून मुळाचा काढा देतात. पानांचा काढा मूत्रल (लघवी साफ करणारा) आहे. याच्या काढ्यामध्ये मुतखडा विरघळतो, असे मानतात. संधिवात व त्वचारोग बरा करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग करतात. फुलांचा अर्क दाढदुखीवर उपाय म्हणून लावतात.

======================
अक्कलकारा (Pellitary)
Post published:26/08/2019
Post author:नरेंद्र देशमुख
Post category:कुमार विश्वकोश / वनस्पती
======================

--मराठी विश्वकोश
----------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-कुमार मराठी विश्वकोश)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.03.2023-बुधवार.
=========================================