दिन-विशेष-लेख-राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन-ब

Started by Atul Kaviraje, April 05, 2023, 12:04:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                               "राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन"
                              ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक- 05.04.2023-बुधवार आहे, ५ एप्रिल हा दिवस "राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     ''आता यात पुराणांचा काय संबंध?''

     ''तुम्हाला समुद्रमंथनाची गोष्ट आठवते? आपण सर्वानी ही गोष्ट बालवयात ऐकली आहे. देवदानवांनी मेरू पर्वताची रवी करून समुद्राचे मंथन केले व त्यातून चौदा रत्ने बाहेर काढली. त्यावरून समुद्राला रत्नाकर असे नाव पडले. पण आपण त्या रत्नांना वैज्ञानिक परिभाषेत भाषांतरीत करण्याचा प्रयत्नही केला नाही.''

     ''म्हणजे काय?''

     ''समुद्रमंथनातून अमृत मिळाले, हे लक्षात आहे ना? आता 'अमृत' याचा शब्दश: अर्थ घेण्यापेक्षा 'दुर्धर रोगावरील औषध' असा अर्थ घेऊन सागरी वैद्यक शास्त्राचा विकास करण्याएवढी वैज्ञानिक प्रगल्भता आपण का अंगी बाणवू शकत नाही? पण त्यासाठी एकूणच सागराकडे गांभीर्याने बघायला हवे. मध्यंतरी मुंबईत 'मेरिटाईम इंडिया समिट' हे प्रदर्शन भरले होते. त्यामध्ये परदेशी लोकांनी केलेली समुद्राशी संबंधित अद्ययावत प्रगती बघायला मिळाली. कोरियासारख्या लहानशा देशात संशोधकांनी समुद्रावर तरंगती घरं बांधण्याचं कौशल्य विकसित केलं आहे. समुद्री शेती, सागरी वैद्यक यांवर विविध प्रयोग विविध सागरविज्ञान विद्यापीठांमध्ये सुरू आहेत, हे सर्व पाहून आपल्या मागासलेपणाची बोच अजूनच तीव्र झाली. आपण अजून मासेमारी, पर्यटन यांमध्येच रांगत आहोत.''

     ''अहो, हे आपले पारंपरिक  व्यवसाय आहेत.''

     ''बरोबर आहे. पण इतर क्षेत्रांत आपण परंपरा ओलांडून आधुनिक झालो की नाही? मग समुद्राच्या संदर्भातच मागे का? एक साधं उदाहरण घ्या. आज सबंध भारत दुष्काळाच्या झळांनी होरपळत आहे. पण त्यावरचा मार्ग म्हणजे 'पावसाच्या पाण्याचं योग्य नियोजन' हाच पारंपरिक विचार आपण करतो. ते नियोजन महत्त्वाचं आहेच, पण त्याबरोबरच आपला जो सनातन सखा समुद्र, त्याच्याकडे आपण अक्षय जलस्रोत म्हणून का बघू शकत नाही? एवढा विशाल सागरकिनारा लाभूनही आपल्याला त्याचे मोल नाही, हे दुर्दैवी आहे.''

     हा दूरदृष्टीचा व संशोधक वृत्तीचा अभाव पुढच्या पिढय़ांपर्यंत पाझरू नये, त्यांना ज्ञानाच्या विशाल दिशांची व क्षेत्रांची ओळख व्हावी म्हणून आम्हाला 'सागरी दिना'च्या कार्यक्रमाचे  विशेष महत्त्व वाटते. पण आमचा कार्यक्रम हा केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित नाही. मनुष्याची वाईट खोड आहे. एखादी नवीन गोष्ट हाती लागली की त्याचा अगदी चावून चोथा करायचा. तसे समुद्राच्या बाबतीत होऊ नये, म्हणून समुद्राविषयी आत्मीयता आपल्या मनात रुजवावी लागेल. वैज्ञानिक झेपेला हे प्रेमाचे अस्तर लावणे, भूमातेइतकाच सागराविषयी आदर व प्रेमभाव बाळगणे, आम्हाला महत्त्वाचे वाटते. म्हणूनच मस्तकात वैज्ञानिक प्रगतीचे विचार व हृदयात अथांग सागराबद्दलचे प्रेम घेऊन आम्ही 'सागर दिन' साजरा केला.

--डॉ.मीनल कातरणीकर
----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लोकसत्ता.कॉम)
                    ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.04.2023-बुधवार.
=========================================