तुझ्या हळुवार स्पर्शांनी!

Started by prachidesai, October 07, 2010, 10:17:39 PM

Previous topic - Next topic

prachidesai

धुक्याचा राग निवळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!
तमाचा रंग उजळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!
कुण्या जन्मातली हुरहूर ही? डोळ्यांपुढे माझ्या -
- कधीचा काळ तरळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!
चिरेबंदी कुठे माझी कुणाला भेदता आली?
चिरा एकेक निखळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!
फुलापेक्षा किती नाजूक आहे जीव हा माझा...
जरा हा भाग वगळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!

तुझ्या-माझ्यात हा जो थंड शब्दासारखा आहे...
अबोला पार वितळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!
कधीपासून ओसंडून जाऊ पाहतो आहे...
अता हा देह निथळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!
दुराव्यातील या जखमा बऱ्या होतील की नाही?
पुन्हा हा प्रश्न चिघळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!

पहा, गेलीस कोमेजून तू श्वासांमुळे माझ्या...!
कशाला गंध उधळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!!
कशासाठी उगा साध्यासुध्या मौनात या माझ्या...
- नको तो अर्थ मिसळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!

....................... प्रदीप कुलकर्णी


sawsac


PRASAD NADKARNI