II देवशयनी आषाढी एकादशी II-लेख-9

Started by Atul Kaviraje, June 29, 2023, 11:52:51 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               II देवशयनी आषाढी एकादशी II
                              ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक 29.06.2023-गुरुवार आहे. आज "देवशयनी आषाढी एकादशी" आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रींना  "देवशयनी आषाढी एकादशी"च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या-निमित्त माहितीपूर्ण लेख. 

                 देवशयनी आषाढ एकादशी--

     आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला 'देवशयनी (देवांच्या निद्रेची) देवशयनी आषाढी एकादशी (ashadhi ekadashi)' आणि वद्य पक्षातील एकादशीला 'कामिका एकादशी', असे म्हणतात.

     भारतीय संस्कृतीत सन्मार्गांने वागावे, सत्याचरण करावे यासाठी मानवास विविध व्रते करण्यात सांगितले आहे. आपल्या मनातील अशुभ विचारांचे पदोपदी मानवी मनावर आक्रमण होत असते हे कोणी नाकारु शकत नाही. मानव व पशु यातील महत्त्वाचा फरक निती अनितीचे परिक्षण करणारी बुद्धि हाच म्हणावा लागेल. " परोपकाराय पुण्याय " हा जागतिक सिद्धांत महर्षी व्यासांनी मांडल्याचे आपण जाणतोच, मात्र त्यानुसार आचरण ही कर्मकठीण गोष्ट आहे.

     याची कमीअधिक प्रचिती प्रत्येकास येतच असते. आपणास प्रयत्नपुर्वक या सन्मार्गदायक महासुत्राचे आचरण करावयाचे असेल तर मन नावाचे इंद्रिय आज्ञेत असणे अत्यावश्यक म्हणावे लागेल. आपल्या प्रत्येक धर्मानुष्ठानाचे उच्चतम ध्येय मनाची स्वभाविक चंचलता कमी करुन सरावाने मनोनिग्रह करणे हेच आहे.

     उपनिषदांचे मत शरीर रथ, इन्द्रिय घोडे व मन लगाम आहे , त्यामुळे मनावर नियंत्रण यशाचा राजमार्गच म्हणावा लागेल. दहा इन्द्रियांनंतर मनास अकरावे इन्द्रिय म्हणून शास्त्राने मान्यता दिली आहे, म्हणून एकादशीस ( अकराव्या तिथीस) भारतीय संस्कृतीत असाधारण महत्त्व आहे. मनावर अंकुश ठेवायचा असेल तर त्यादृष्टीने एकादशीस व्रत करणे फलदायी ठरते. आपण कोणतेही व्रत करतो तेव्हा ते मूलतः काम्यव्रत असते म्हणजे उत्तम नोकरी, व्यावसायिक प्रगती , सांसारीक सुख हा प्रामुख्याने हेतु असतो.

     व अशाप्रकारची व्रते ऐच्छिक असतात ती कोणी निसर्गतः स्वीकारत नसतो. उदिष्ठपुर्तीसाठी दैवीउपासना हे त्यांचे लक्ष असते. मात्र एकादशी व्रत हे श्वासोश्वास करणा-या मानवाने जाणीवपूर्वक आपल्या सर्वांगिण प्रगतीसाठी करावे असे सांगितले आहे. उपवास व हरिस्मरण हा या व्रताचा मुख्य भाग आहे.

     आहारशास्त्राचा विचार केला तर लंघन करणे हे शरीरास आरोग्यदायक ठरते, जसे शरीराचे आरोग्य आवश्यक आहे तसेच मनास सामर्थ्यसंपन्न करण्यासाठी एकादशीस हरिस्मरण करणे हितकारक ठरते. एकादशीचे व्रत करावयाचे असेल तर दशमीच्या रात्री उपवास सुरु करुन एकादशीस पूर्ण दिवस उपवास करुन व्दादशीस महानैवेद्य दाखवून उपास सोडावा.

          प्रातःस्मरणीय तुकाराम महाराजांचे एकादशी संदर्भातील पुढिल अभंग या संदर्भात प्रेरणादायी आहेत--

एकादशीस अन्न पान । जे नर करिती भोजन ।
श्वानविष्ठेसमान । अधम जन तो एक ॥
ऎका व्रताचें महिमान । नेमें आचरती जन ।
गाती ऎकती हरिकिर्तन । ते समान विष्णूशी ॥
अशुद्ध विटालशींचे खळ । विडा भक्षिंती तांबूल।
सांपडे सबळ । काळाहातीं न सुटे ॥
शेज बाज विलास भोग । करि कामिनीशीं संग ।
तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी बळिवंत ॥
आपण न वजे हरिकिर्तन। आणिकां वारी जातां जन ।
त्याच्या पापा जाणा । ठेंगणा महामेरु तो ॥
तया दंडी यमदूत । झाले तयाचे अंकित ।
तुका म्हणे व्रत । एकादशी चुकलीया ॥

                          (साभार आणि सौजन्य-संदर्भ-संतसाहित्य.इन)
                         ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2023-गुरुवार.
=========================================