II गुरुपौर्णिमा II-कविता-4

Started by Atul Kaviraje, July 03, 2023, 05:26:07 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     II गुरुपौर्णिमा II
                                    ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०७.२०२३-सोमवार आहे. आज "गुरुपौर्णिमा" आहे. वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गुरुची पुजा केली जाते. आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. जे आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांचे पूजन या दिवशी लोक फार श्रद्धने करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना गुरु-पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुरु-पौर्णिमेवर काही कविता.

                     गुरुपौर्णिमा कविता--

                           कवितेचे नाव :- छडी--

नजरेपुढे कठोर होते, नजरेआडून पाझरते
सर, तुमची छडी अजून भविष्याला सावरते !!

पुस्तकांची हाक येते दप्तराच्या कंठातून
संस्कारांच्या कंपासपेटीत आयुष्याला सामावून
शिष्य म्हणून, युवक म्हणून, 'माणूस' म्हणून घडवते
सर, तुमची छडी अजून भविष्याला सावरते !!

तेव्हा तुम्ही बाकावरती उभं केलं नसतं जर
विचारांची पोहोच कधी गेली नसती ध्येयावर
अडथळयांचा डोंगर एका क्षणामध्ये झुकवते
सर, तुमची छडी अजून भविष्याला सावरते !!

आठवणींच्या फळयावरती अजून आहेत सुविचार
शिस्तीच्या त्या गणिताला ममत्वाचा गुणाकार
नजरेमध्ये सूर्य घेऊन आभाळ व्हायला शिकवते
सर, तुमची छडी अजून भविष्याला सावरते !!

--DRx Chakradhar.S.More
-----------------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी महिला.कॉम)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2023-सोमवार. 
=========================================