दिन-विशेष-लेख-अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन

Started by Atul Kaviraje, July 04, 2023, 04:34:28 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                   "दिन-विशेष-लेख"
                                "अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन"
                               -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-04.07.2023-मंगळवार आहे. ४ जुलै-हा दिवस "अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     जगातील सर्वात शक्तिशाली देश युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका दरवर्षी 4 जुलै रोजी आपला स्वातंत्र्यदिन साजरा करतो. अमेरिका देखील एकेकाळी ब्रिटनच्या अधिपत्याखाली होती. 4 जुलै 1776 रोजी त्यांनी ब्रिटिश साम्राज्यापासूनमुक्ती मिळवत स्वातंत्र्याची घोषणा केली.

              अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा--

     अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा: उत्तर अमेरिका खंडातील ब्रिटिश वसाहतींनी मायदेशाविरुद्ध युद्ध पुकारल्यानंतर आपले ध्येय व उद्दिष्ट जगाला समजावे आणि स्वतंत्र राष्ट्रांचे आपल्याला साहाय्य मिळावे, म्हणून वसाहतींच्या प्रतिनिधिसभेने ४ जुलै १७७६ रोजी स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. तेव्हापासून ४ जुलै हा अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो.

     वसाहती व मायदेश यांच्यातील वाद विकोपाला जाऊन युद्ध सुरू झाल्यावरही वसाहतींनी ब्रिटनचे सार्वभौमत्व मान्य करावे, पण अंतर्गत व्यवहारात वसाहतींना स्वातंत्र्य असावे, अशी तडजोड घडवून आणण्याचे प्रयत्‍न झाले तथापि उभय पक्षांतील जहालांच्या विरोधामुळे ते फसले. युद्ध सुरू होताच वसाहतींनी फ्रान्ससारख्या देशांची मदत मिळविण्याचे प्रयत्‍न सुरू केले. तेव्हा लढून यश मिळविल्यानंतरही वसाहती ब्रिटनची ताबेदारी स्वीकारणार असतील, तर फ्रान्स आदी देशांनी त्यांच्या भानगडीत का पडावे, असा प्रश्न त्या देशांतील मुत्सद्दी व राज्यकर्ते उपस्थित करू लागले. त्यांच्या समाधानकारक उत्तरासाठी निर्भेळ स्वातंत्र्याचा पुरस्कार आवश्यक होता.

     व्हर्जिनिया वसाहतीचा प्रतिनिधी रिचर्ड हेन्‍री ली याने काँटिनेंटल काँग्रेसमध्ये मांडलेला निर्भेळ स्वातंत्र्याचा ठराव २ जुलै १७७६ रोजी मान्य झाला. या ठरावावर चर्चा चालू असताच स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार करण्यासाठी ⇨टॉमस जेफर्सन, ⇨बेंजामिन फ्रँक्लिन, जॉन ॲडम्स, रॉजर शेर्मन व रॉबर्ट लिव्हिंगस्टन या सभासदांची नियुक्ती झाली परंतु जाहीरनाम्याची भाषा व भावना ह्या दोहोंचाही जेफरसन हाच मुख्य शिल्पकार होता. त्यात काही दुरुस्त्या करून काँग्रेसने तो सर्वानुमते स्वीकारला.

     ह्या जाहीरनाम्यात ब्रिटनने व विशेषतः तिसऱ्‍या जॉर्जने वसाहतींवर केलेल्या अन्यायांची यादी दिली आहे. वसाहतींची स्वातंत्र्याची मागणी निसर्गसिद्ध असल्याच्या तात्विक प्रतिपादनास त्यात प्राधान्य दिले आहे. जन्मतः व निसर्गतः सर्व माणसे सारखी असतात, हा सिद्धांत यात ठासून मांडला आहे. काही ईश्वरदत्त अधिकारांपासून माणूस वंचित राहू शकत नाही, या सूत्राच्या स्पष्टीकरणार्थ या जाहीरनाम्यात जीवितविषयक अधिकारांची परिगणना केली असून तिला सुखाकांक्षेच्या पूर्तीची पुस्ती जोडली आहे. सरकार ही संस्था मनुष्यनिर्मित असल्याने उन्मार्गगामी सरकार बदलून नवे सरकार अस्तित्वात आणण्याचा मानवाचा अधिकार वादातीत आहे, असा या अधिकाराचा गौरव या जाहीरनाम्याने केला आहे.

     या जाहीरनाम्यावर लॉक, रूसो प्रभृती यूरोपीय तत्त्ववेत्यांच्या विचारसरणीचा व टॉमस पेनचा प्रभाव पडलेला स्पष्टपणे दिसून येतो. याच्या स्वीकृतीमुळे ब्रिटनशी तडजोड अशक्य झाली, वसाहतींना अन्य देशांची मदत मिळणे सुलभ झाले व अमेरिकेचे स्वातंत्र्य दृष्टिपथात आले. अमेरिका स्वतंत्र होऊन आता दोनशे वर्षे होत आली. या काळात निरनिराळ्या देशांतील अन्यायी राजवटींविरुद्ध झालेल्या संघर्षात मानवी गटांच्या प्रयत्‍नांना तात्विक बैठक मिळाली ती या जाहीरनाम्यातील विचारांची हे अमेरिकेतील निग्रोंच्या हक्कांची चळवळ, अनेक देशांचे पारतंत्र्यातून विमोचन व अनेक देशांतील साम्राज्यशाहीविरुद्धचे संघर्ष इत्यादींवरून दिसते. फ्रेंच क्रांतिकारकांनी स्वीकृत केलेली मानवी हक्कांची सूची व निरनिराळ्या देशांच्या संविधानांत ग्रथित झालेले नागरिकांचे मूलभूत हक्क याच जाहीरनाम्यावर आधारलेले आहेत. त्यामुळे 'मानवी इतिहासाला कलाटणी देणारी आधुनिक काळातील क्रांतिकारक घोषणा' असा या जाहीरनाम्याचा गौरव होतो तो यथार्थच वाटतो.

--करंदीकार, शि. ल.
------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विश्वकोश.मराठी.गोव.इन)
                   ------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.07.2023-मंगळवार.
=========================================