दिन-विशेष-लेख-संत मुक्ताबाई स्मृतीदिन-B

Started by Atul Kaviraje, July 04, 2023, 04:38:07 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "दिन-विशेष-लेख"
                              "संत मुक्ताबाई स्मृतीदिन"
                             -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-04.07.2023-मंगळवार आहे.  ४ जुलै-हा दिवस "संत मुक्ताबाई स्मृतीदिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

             मुक्ताबाईच्या जीवनातील ठळक घटना--

     जन्म - आश्विन शुद्ध प्रतिपदा (घटस्थापना) (शके ११९९ किंवा शके १२०१) (शकाबद्दल अभ्यासकांमध्ये दुमत आहे.)

              बालपण--

     बालपणी आई-वडील यांच्यासोबत ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली. त्यानंतर अल्पावधीतच आई-वडिलांचा देहत्याग झालेला आहे. त्यामुळे लहान वयातच तीन भावंडाच्या पाठीवरील ही धाकटी बहीण प्रौढ बनली.

             ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईस दिलेली सनद--

     वडील-बंधू निवृत्तीनाथ यांच्याकडून ज्ञानेश्वर, मुक्ताबाई आणि सोपानदेव यांना नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली. त्यामुळे ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई यांच्यामध्ये गुरू बंधुभगिनी असे एक हृद्य नाते निर्माण झाले. मुक्ताबाईना आलेल्या साधनेतील शंका त्यांनी ज्ञानेश्वरांना विचाराव्यात आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या आधारे पुढे वाटचाल करावी असे चालू असे. एके दिवशी ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईस सांगितले, आठवे समाधीचे अंग आले तुज, आता नाही काज आणिकांसी. ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई यांच्यातील हे संवाद ज्ञानेश्वरांनी 'मुक्ताबाईस दिलेली सनद' या नावाने प्रसिद्ध आहेत.

     यानंतर विसोबा खेचर शरण आले आहेत असे दिसते. शुद्धिपत्र मिळविण्यासाठी पैठण गावी चारही भावंडे गेलेली असताना, मुक्ताबाईबद्दलची पैठणकरांची प्रतिक्रिया अशी होती की, हे तिन्ही अवतार तीन देवाचे l आदिमाता मुक्ताई मुक्तपणे अवतरली ll मुक्ताबाईचा ब्रह्मचित्कला नावाने देखील सन्मान झाला असल्याचे आढळते.

               शुद्धिपत्र मिळविण्यासाठी पैठण येथे--

     ज्ञानेश्वरादी भावंडे शुद्धिपत्र मिळविण्यासाठी पैठण येथे गेली असताना, सदैव आत्ममग्न स्थितीमध्ये असे. 'तुर्यावस्थारता सुता मुक्ता' असे दर्शन सर्वांना घडत होते.

                ताटीचे अभंग आणि ज्ञानेश्वरीची निर्मिती--

     ज्ञानाची कवडे बंद करून घेतलेल्या ज्ञानेश्वरांना मुक्ताबाईने ताटीच्या अभंगाद्वारे विनवणी केली आणि त्यातून पुढे ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली.

                योगीराज चांगदेव भेट--

     ज्ञानेश्वरादी भावंडांची थोरवी ऐकून भेटायला आलेल्या योगीराज चांगदेवांना तिन्ही भावंडानी मुक्ताबाईंकडे सोपविले आहे. स्वतःच्या योगसिद्धीचा अहंकार झालेल्या चांगदेवाबाबत त्या म्हणतात, '' योगिया म्हणवी आणि इंद्रियांचा रंकु l तयाचा विवेकु जाळी परता ll'' ज्ञानेश्वरादी भावंडांची अचेतनावरील सत्ता पाहून चांगदेव शरण आले तेव्हा येथेच मुक्ताबाईंनी चांगदेवांना चांगदेव पासष्टीचा अर्थ समजावून दिला. आणि मग त्यांच्यामध्ये गुरू शिष्य हे नाते निर्माण झाले. आपण मुक्ताबाईचे शिष्य झालो यातील धन्यता चांगदेवांनी पुढील शब्दांत व्यक्त केली आहे, ''चौदा शत झाली बुद्धी माझी गेली l सोय दाखविली मुक्ताईने ll'' चांगदेव मुक्ताबाईंना शरण आले. ते त्यांचे शिष्योत्तम झाले. चांगदेवांनी येथे सद्गुरू मुक्ताबाई आणि इतर तिन्ही भावंडांची पूजा केली. 'मुक्ताई मुक्तरूप मुक्तीची चित्कला l नित्य मुक्तलीळा दावी अंगी ll' या भावनेने त्यांनी पूजा केली होती.

               संत नामदेवांची भेट--

     संत नामदेव जेव्हा ज्ञानेश्वरादी चार भावंडांच्या भेटीला आले तेव्हा सर्वांनी त्यांना वंदन केले, मात्र मुक्ताबाईने त्यांना नमस्कार करण्यास मनाई केली. सद्गुरूविना परमार्थप्राप्ती नाही, हे त्यांना कळावे यासाठी मुक्ताबाईचा प्रयत्न होता. गुरू गोरक्षनाथ यांच्या थापटण्याच्या प्रसंगातून नामदेवांना स्वतःचे अपुरेपण लक्षात आले आणि पुढे ते विसोबा खेचर यांना शरण गेले. 'लहानसी मुक्ताबाई जैसी सणकांडी' असा उल्लेख नामदेवांनी केला.

             गोरक्षनाथ कृपेचा अनुभव आणि मिळालेले वरदान--

     नामदेवांच्या परीक्षेच्या निमित्ताने मुक्ताबाई यांच्या योगसामर्थ्याची प्रचिती भावंडांना आली आणि मुक्ताबाई 'माय' या स्वरुपात वंदनीय झाली. या प्रसंगामध्ये मुक्ताबाई यांना गोरक्षनाथ यांच्या कृपेचा अनुभव आला. अमृत संजीवनी लाभण्याचा हा अनुभव होता. याच प्रसंगी त्यांना 'चिरकाल अभंग शरीरा'चे वरदान मिळाले होते.

               मुक्ताबाईंचा अज्ञातवास--

     पुढे श्रीज्ञानेश्वर भावंडे आणि संत नामदेव हे तीर्थाटनास गेलेले आहेत, त्याचे सविस्तर वर्णन नामदेव गाथेमध्ये आले आहे. परंतु या तीर्थयात्रेस मुक्ताबाई गेल्या नाहीत. शिष्य योगीराज चांगदेव यांच्यासमवेत त्या आळंदीजवळ असलेल्या सोळू या गावी अज्ञातवासात राहिल्या.

--विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
------------------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.विकिपीडिया.ऑर्ग)
                    ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.07.2023-मंगळवार.
=========================================