पीक

Started by Atul Kaviraje, July 07, 2023, 12:38:17 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     शेतकऱ्याची व्यथा थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न मी या लघु-कवितेतून केला आहे. हारतो तरी तो पुन्हा उठून उभा राहतो. हे सर्व तो त्या पिकासाठी करतो. वाचूया तर माझी पुढील वास्तव कविता. या कवितेचे शीर्षक आहे-"पीक"

                       "पीक"
                      --------

मातकट हात, कळकट शरीर
घामेजलेले अंग, नांगरणीचा नांगर

कष्टकरी हाती कुदळ फावडा
घर्मबिंदूंचा अगणित भुईवर सडा

सूर्योदय ते सूर्यास्त काळ
शेती निनादतोय अथक फाळ

अथक श्रम, काबाड कष्ट
निरंतर मेहनतीस न लागो दृष्ट

ढगांकडे नजर, पाण्यासाठी आर्जव
बारमाही पिकांसाठी जळाचा आरव

साठवणीस नाही, पदराचे सर्व काही
दुसऱ्यांसाठी सारे, भान नाही देही

कसाही दुष्काळ, कितीही दुर्भिक्ष्य
पिकासाठी सारे, एकच ते लक्ष्य

झोपडीचा आसरा, फाटक्या छप्परी निवारा
मोकळ्या आकाशाखाली मोजकाच पसारा

पिकासाठी सारी धडपड याची
बहरलेला मळा देतो ग्वाही आनंदाची

याचसाठी जन्म, कसेही येवो मरण
इतरांसाठी जगणे, हेच का कारण ?

ढगफुटी येता, वाहून जाती पिके
गणना नाही, त्याच्या दुःखे

पण अजूनही नाही थकलाय 
उम्मेदीवरच तो आजही जगलाय   

उद्याची आहे त्याला आस
भरघोस पीक येईल हमखास

वर्षानुवर्षे हेच घडतंय, घडेल
कुणा पर्वा, त्याच्यासाठी कोण रडेल ?

नेमके जीणे काय बळीराजाचे
कुणी जाणेल दुःख शेतकऱ्याचे ?

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.07.2023-शुक्रवार.   
=========================================