दीपस्तंभ

Started by Atul Kaviraje, July 07, 2023, 05:10:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     हा दीपस्तंभ गेली कित्येक वर्षे, शतके तसाच उभा आहे. अजून किती वाट पाहायची आहे, भविष्य काय, प्राक्तन काय, कुणास ठाऊक. वाचूया तर या दीपस्तंभाची शोकांतिका माझ्या पुढील लघु-कवितेतून. या कवितेचे शीर्षक आहे-"दीपस्तंभ"

                      "दीपस्तंभ"
                     -----------

उजळ माथा, वर निव्वळ अंबर
समुद्राची गाज, ऐकीत निश्चल स्थिर

सोसाट्याचा वारा, झेलीत अंगावर
विजांचा कडकडाट, लखलखाट डोक्यावर

तुफाने पचवीत, वादळे शमवित
सागराच्या उंच लहरी झेलीत

पावसाचा मारा, अगणित गारा
नाही रक्षण, नाही छप्पर निवारा

पायथ्याच्या कातळाशी मध्येच हितगुज
शतकानुशतके जपलेले दडलेले गुज

अखंड तेवती दिव्याची ज्योत
वाट चुकलेल्या जहाजांचा गणगोत

दिवस प्रकाशाचा, रात्र अंधारी
अचूक मार्गदर्शनाचा वसा अंतरी

तटस्थ संन्यस्थ साधुसम विरक्ती
अपेक्षा नच, उपकारी वृत्ती

वर्षानुवर्षे उभा, सांभाळीत डोलारा
प्रकाशाचा जणू लखलखता देव्हारा

कधी घडविला, कुणी उभारीला
भूतकाळ अगम्य, भविष्य माहित कुणाला ?

प्रशांत सागर, खवळलेला रत्नाकर
साथीला तोच, जिवाभावाचा मैतर

नाही हरणं, नाही उद्धरण
प्राक्तन हेच, जणू एकले रण

जागी एकाच शापित उभा
वाट पाहात, न्याहाळीत नभा

वर्षे गेली, शतके गेली
दीपस्तंभाची अशीच हयात चालली

हा श्राप कधी सरेल ?
उद्धारा कुणी तरी येईल !

तोवर हेच जीवनाचे गाणे
सागराच्या लाटांतून निरंतर ऐकणे

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.07.2023-शुक्रवार.   
=========================================