कैलास

Started by Atul Kaviraje, July 08, 2023, 05:05:29 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     कैलास पर्वत हा नेहमीच गूढतेचे वातावरण निर्माण करून गेली कित्येक शतके बर्फात उभा आहे. शिव-शंकराचे शक्तीस्थान, त्याचे निवासस्थान म्हणून त्याची ओळख आपणास आहे. वाचूया, तर या अगम्य, गूढ अश्या पर्वताची तितकीच गूढ एक लघु-कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "कैलास"

                 "कैलास"
                ---------

परम शिवतत्त्वाचा पृथ्वीवरील आवास
अगम्य, गूढ, अनाकलनीय कैलास

बर्फात झाकलेला, धुक्याने वेढलेला
अनेक डोंगर दऱ्या साथीला

सातत्याने ओम नमः शिवाय जाप
परिभ्रमणे मिळेल का उ:शाप ?

पापांचे परिमार्जन, पुण्याईची पावन धारा
कैलासा करी अमंगळाचा निचरा

तो शिव, तो शंकर
कैलासाचा योगी सर्वत्यागी ईश्वर

परब्रह्माचा आविष्कार, पवित्र ओंकार
गूढ ध्वनी गुंजे सर्वाकार

जन्मोजन्मीची प्रतीक्षा, देई दीक्षा
फेरा पुन्हा पुन्हा घेई परीक्षा

भक्तीचा मार्ग, कैलासा स्वर्ग
टिकूनी युगेयुगे, टिकेल दीर्घ

ओंकार नाद घुमे परिसरी
देऊन जाई साक्षात्कार परमेश्वरी

उत्तुंग शिखर, आभाळाशी समांतर
बर्फातून दिसे उठून कातळ-कपार

चैतन्याचा स्रोत वाहे अंतर-बाह्य
मनःशांतीस करी भक्तासी साहाय्य

परम-शांतीचे दैवी अद्भुत ठिकाण
कैलासावरी शोभे शिव-शंकराचे निशाण 

ज्याचा ओंकार मनी प्रकटला
त्यासी रुद्राक्षाचा मणी गवसला

सर्वनाशाची ही एक त्री-देवता
कैलास पर्वताची ओळख देता

ऐसे मंगल-धाम उभे युगानुयुगे
चिरंजीवी ठेवा जपुनी संगे

मोक्षाचा मार्ग येथेची गवसेल
शिवाचा प्रसाद कैलासी पावेल
   
पुण्य पावन धरेची ओळख
होई कैलासामुळे तिची पारख

शाश्वत, चिरंतन, अजर-अमर कैलास
शिवाचे मंदिर, महादेवाचा निवास 

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.07.2023-शनिवार.   
=========================================