पावसातली प्रेम-कविता-गीत-ही पावसाची पाऊलवाट निसरडी,खुणावतेय मला करण्यास लाडीगोडी

Started by Atul Kaviraje, July 25, 2023, 11:32:35 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, रिमझिम पावसातली एक वेगळी प्रेम कविता-गीत ऐकवितो. "आज रपट जायें तो हमें ना उठइयो,आज फिसल जायें तो हमें ना उठइयो"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस जुलै महिन्याची ही ऊन पावसाचा खेळ दाखविणारी मंगळवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( आज रपट जायें तो हमें ना उठइयो,आज फिसल जायें तो हमें ना उठइयो )           
-----------------------------------------------------------------------

         "ही पावसाची पाऊलवाट निसरडी, खुणावतेय मला करण्यास लाडीगोडी" 
        --------------------------------------------------------------

ही पावसाची पाऊलवाट निसरडी,
खुणावतेय मला करण्यास लाडीगोडी
लाडके, हाती तुझा हात दे,
प्रणयास येईल मग अधिकच गोडी

ही पावसाची पाऊलवाट निसरडी,
खुणावतेय मला करण्यास लाडीगोडी
वर्षणाऱ्या पावसात फक्त तू आणि मी,
अन साचलेल्या डबक्यात कागदाची होडी

आज पाऊस काही वेगळाच दिसत आहे
आज पाऊस काही विशेष सांगत आहे
ही पाऊलवाट दूरवर धुक्यात विरलेली,
तुला आणि मला हाक देत आहे

ही हवा कशी आपणास बिलगून आहे
सरसरता वारा अलगूज वाजवून आहे
धसमुसळा कसा अंगाशी खेळून,
छत्रीला हलकेच उडवून लावीत आहे

चिंब चिंब भिजवून तुला खट्याळ पाऊस
मजकडे तुझी चुगली करीत आहे
अन तुझे ओलेते सौंदर्य मजला,
आपसूक तुझ्याकडे आकर्षित करीत आहे

अंतर्मनातील गोड उर्मी जागी होत
ती रोमारोमात खोलवर भिनत आहे
तुझे आरसपानी मधुर लावण्य मला,
तुला कवेत घेण्यास खुणावत आहे

माझं मन थाऱ्यावर नाहीय आज
मी माझाच नाही राहिलोय आज
पावसाने काय जादू केलीय कुणास ठाऊक,
त्याच्या प्रत्येक थेंबात नशाच भरलीय आज

पाहता पाहता वीज नृत्य करू लागलीय
लखलखत्या रूपात क्षितिजी आकारू लागलीय
कडकडाटाने भयभीत झालेली तुझी काया,
माझ्या मिठीत घट्ट थरथरू लागलीय

भानावर येताच लाज लाजून चूर
हलकेच झालीस तू मग दूर
गालावरचे गुलाब ऐकवून गेले मज,
तुझ्या हृदयातले प्रेमाचे मधू सूर

आज पाऊस जणू नशाच बरसवीत आहे
कृष्ण मेघातून मदिरा भांडार झरत आहे
आज कोणीच शुद्धीत भानावर नाही,
तुझी माझी कहाणी काही वेगळी नाही

थेंबांचे हे पैंजण पहा कसे थिरकत आहेत
छमछम नादाने वातावरण मोहित करीत आहेत
उडणारे शीत तुषार गजल छेडीत आहेत,
पावसाचे हे गीत-संगीत मनास रिझवीत आहे

आता छटा अधिकच गडद होत आहेत
ही पावसाची रात्र अधिकच गर्द होत आहे
या वळणावळणाच्या निसरड्या पाऊलवाटेवर,
तन मन तुझ्यासवे आनंदे बागडू पहात आहे

वाटतं हा पाऊस कधीच थांबू नये
तू असाच नित नवं रूप घेऊन ये
तुझ्यात भिजण्याचा मोद आम्हा मिळू दे,
भेटण्याचे आणखी एक कारण आम्हा मिळू दे

आज आम्हा तू अधिकच तरुण केलेस
वयाचे बंधन तोडून खेळावयास लावलेस
आमचे प्रेम शनै शनै वृद्धिंगत केलेस,
तुझ्या जलधारांत ते स्वैर मुक्त वाहिले 

ही पावसाची पाऊलवाट निसरडी,
खुणावतेय मला करण्यास लाडीगोडी
पावसाच्या मंद शीतल जलधारांत,
प्रियेच्या मिलनाची आस लावून वेडी

ही पावसाची पाऊलवाट निसरडी,
खुणावतेय मला करण्यास लाडीगोडी
दूरवर जाणारी ही पाऊलवाट नागमोडी,
पावसाच्या पडद्याआड धुक्यात विरत जाणारी

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.07.2023-मंगळवार.
=========================================