पावसाची अनोखी प्रेम कविता-पडती पावसाच्या झिम-झिम धारा, माझ्या मनास नाही आज थारा

Started by Atul Kaviraje, July 31, 2023, 10:22:12 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, आजच्या पावसाची एक अनोखी प्रेम कविता-गीत ऐकवितो. "रिम-झिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन-गायक-किशोर कुमार"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस जुलै महिन्याची ही काहीशी मळभ असलेली व पाऊस पूर्णपणे थांबलेली, सोमवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(रिम-झिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन-गायक-किशोर कुमार)           
-------------------------------------------------------------------------

              "पडती पावसाच्या झिम-झिम धारा, माझ्या मनास नाही आज थारा"     
             ---------------------------------------------------------

पडती पावसाच्या झिम-झिम धारा
माझ्या मनास नाही आज थारा
मन कसं दोलायमान झालंय माझं,
शोधतंय ते तुझ्या पदरी निवारा

पडती पावसाच्या झिम-झिम धारा
माझ्या मनास नाही आज थारा
हे असं नेहमीच नव्हतं घडतं,
काय सांगतोय हा पाऊस कोसळणारा ?

पडती पावसाच्या झिम-झिम धारा
माझ्या मनास नाही आज थारा
हा ओला ऋतू शिलगावून गेलाय,
अवचित, तनुचा दाहक निखारा

मला या पावसाचे कोडेच पडलेय
त्याचे पडणे आज असह्य झालेय
शीतल गार त्याचे जलबिंदू आज,
तन-मनात वणवा पेटवून गेलेय

छम छम वाजणारे त्याचे थेम्ब
धरेवर मधुर नाद करीत आहेत
जणू कुणी नर्तिका बांधून घुंगरू,
दिलखेचक मोहक पदन्यास करीत आहे

माझे तृप्त मन तो रव ऐकून
अनोख्या विश्वात रममाण होत आहे
हे कर्णमधुर संगीत याआधी कधी ऐकले ?,
मन अधिकाधिक संभ्रमित होत आहे

हे आज काय घडतंय माझ्यासवे ?
मी चक्क उघड्या डोळ्यांनी स्वप्नच पाहतोय
पावसाने ही किमयाच केलीय आज,
माझ्या आशा तो पल्लवित करून जातोय

या स्वप्नात मी तुला शोधतोय
अथक, अमीट खुल्या नेत्रांनी
आताशा मला जाणिवाही करून दिल्यात,
गात्रागात्रात वाहणाऱ्या प्रत्येक स्पंदनानी

मला या पावसाने बेहोष केलंय
तुझ्या प्रेमात मला बळेच ओढलंय
माझं अस्तीत्व आता माझं नाही राहिलंय,
तुझ्यात ते केव्हाच एकरूप झालंय

त्या मैफिलीत तू मला भेटल्यापासून
माझ्या मनाचा तोल तेव्हाच ढळला होता
मूर्तिमंत लावण्याचा आविष्कार पाहून,
मला प्रेमाचा साक्षात्कार झाला होता

तेव्हापासून माझं मन माझ्या कह्यात नव्हतं
तेव्हापासून माझं मन तुझं झालं होतं
हे दग्ध मन तेव्हाच शांत झालं होतं,
जेव्हा तू मला मनापासून हो म्हटलं होतं

आज तू मला अजनबी नाहीस
आज तू मला अनोळखी नाहीस
या पावसाचा शतशः ऋणी आहे मी,
आज तू माझ्या मनाची राणी झालीस

हा पाऊस इतकं करील वाटलं नव्हतं
तन-मनात आग लावेल स्वप्नातही नव्हतं
तुझी माझी भेट घडवेल वाटलंही नव्हतं,
पोळत्या मनावर फुंकर मारेल जाणंलही नव्हतं

माझं संदिग्ध मन आज शांत झालंय
माझं दग्ध तन आज निवांत झालंय
या पावसानेच ही आग लावली होती,
आता त्यानेच तिचं निवारण केलंय

पडती पावसाच्या झिम-झिम धारा
माझ्या मनास आज मिळालाय थारा
मजसी प्रियेची गाठ घालून देणारा,
तोच माझा मित्र सवंगडी खरा

पडती पावसाच्या झिम-झिम धारा
सवे झुलवणारा गार गार वारा
सर्व सर्व शंकांचा करून निचरा,
वाहतोय मनातून प्रेमाचा निर्मळ शुभ्र झरा

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.07.2023-सोमवार.
=========================================