दिन-विशेष-लेख-ऑगस्ट क्रांतिदिन-A

Started by Atul Kaviraje, August 09, 2023, 04:53:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                                   "ऑगस्ट क्रांतिदिन"
                                  -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक- 09.08.2023-बुधवार आहे.  ९ ऑगस्ट-हा दिवस "ऑगस्ट क्रांतिदिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     ९ ऑगस्ट १९४२ रोजी चळवळीस सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने महात्मा गांधीसह कॉग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक करुन चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अटकेनंतर अरुणा असफ अली यांनी ऑल इंडिया कॉग्रेस कमिटीचे नेतृत्व केले. हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी '९ ऑगस्ट' हा ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो.

              9 ऑगस्ट 1942 ''ऑगस्ट क्रांती दिन''--

     इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे ९ ऑगस्ट, अर्थात क्रांती दिन! स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करण्याची हाक देणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस, पण स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यात दंग असलेल्या आजच्या पिढीसाठी हा दिवस 'अनोळखी' झाला आहे. सर्वांच्या हृदयात क्रांतिवीरांची ती मशाल आठवणीच्या रूपाने धगधगत राहणे अपेक्षित असले तरी ती मशाल केव्हाच विझली आहे. एवढेच काय प्रशासकीय यंत्रणेसाठीही या दिवसाचे महत्व आता औपचारिकतेपुरते शिल्लक आहे.

     दीडशे वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी ९ ऑगस्ट १९४२ रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती. या लढ्यात गोंदिया जिल्ह्यातील काही लोकांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्या क्रांतिलढ्याची आठवण म्हणून ९ ऑगस्टला 'क्रांती दिन' पाळला जातो. परंतु आज या दिवसाचे महत्व नवीन पिढीलाच नाही, तर नेते-पुढाऱ्यांनाही राहिलेले नाही.

     मुंबईत भऱलेल्या कॉंग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी केलेली 'छोडो भारत'ची गर्जना आणि दिलेला ''करेंगे या मरेंगे'' हा मंत्र नऊ ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण देशात पसरला होता. त्यामुळे यादिवशी क्रांतीची ज्योतच जणू पेटली. देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनांना सुरवात झाली. प्रत्येकाला जे योग्य वाटेल ते तो करत होता. ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती. हे रोखायचे कसे असा प्रश्न पडला होता. त्याची पूर्वसूचना आदल्या रात्रीच्या भाषणातच मिळाल्याने ब्रिटिशांनी पहाटे पाच वाजताच मुंबईत बिर्ला हाऊसमधून गांधीजी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतले. यावेळी गांधीजींनी जनतेला संदेश दिला, ''आता प्रत्येकजणच पुढारी होईल.''

     ब्रिटिशांनी काँग्रेसच्या सर्व नेतेमंडळींना अधिवेशनाच्या जागीच अटक केली होती. त्यांना सर्वांना पुण्यात हलविण्यात आले. चिंचवड स्टेशनवर गाडी थांबवून महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई आणि मीराबेन या चौघांना खाली उतरवून त्यांची रवानगी गुप्त ठिकाणी करण्यात आली. बाकीच्यांना पुढे नेण्यात आले. सरकारने गुप्तता पाळली तरी बातमी फुटलीच. गांधीजींना पुण्यात आगाखान पॅलेसमध्ये आणि नेहरू, पटेल, आझाद या मंडळींना अहमदनगरच्या किलल्यात ठेवण्यात आल्याचे समजले.

     नेत्यांची धरपकड झाल्याने आंदोलन लोकांच्या ताब्यात गेले. देशभर जागजागी हरताळ, मिरवणुका, मोर्चे यांना ऊत आला. सरकारने लोकांना एकत्र जमण्यास बंदी घातली. पण लोक आता आदेश मानायला तयार नव्हते. पोलिसांच्या लाठीहल्ल्याला, गोळीबाराला जुमानत नव्हते. जाळपोळ, पोलिसांचे खून, टेलिफोन व तारा कापणे असे प्रकार सुरू झाले.

     जणू लोकांनी ब्रिटिश सत्तेविरूद्ध युद्ध पुकारले होते. संपूर्ण देश पेटला होता. दंगल जाळपोळ, गोळीबार, रेल्वेचे अपघात, सरकारी कार्यालयांना आगी लावणे, सरकारी खजिन्यांची लुटालूट असे प्रकार सुरू होते. सरकार दडपशाही करून पाहिजे त्याला विनाचौकशी अटक करत होती. सारा देश गोंधळलेल्या अस्थिर परिस्थितीत सापडला होता.

     सरकारने या सर्व प्रकाराला गांधीजींना जबाबदार ठरवले. गांधीजींना याचा इन्कार करून याच्या निषेधार्थ 21 दिवसांचे उपोषणही केले. पण जगभरातील परिस्थितीही बदलत होती. युद्धाचे पारडे दोस्त राष्ट्रांच्या बाजूने झुकत होते. अमेरिका नावाची सत्ता उदयास येत होती. तिने युद्धाचे पुढारीपण घेतले होते. या साऱ्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर क्रांतीसंग्रामाची तीव्रता ओसरली.

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-सूत्र संचालन.कॉम)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.08.2023-बुधवार.
=========================================