दिन-विशेष-लेख-भारत छोडो दिवस-B

Started by Atul Kaviraje, August 09, 2023, 05:05:17 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                                  "भारत छोडो दिवस"
                                 -------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक- 09.08.2023-बुधवार आहे.  ९ ऑगस्ट-हा दिवस "भारत छोडो दिवस" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     अनेक दिवस उत्स्फूर्तपणे हरताळ पाळण्यात आले. जागोजागी निषेध मोर्चे निघाले. अनेक ठिकाणी सरकारी कचेऱ्यांवर हल्ले झाले आणि युनियन जॅक खाली उतरवून राष्ट्रीय झेंडा त्या ठिकाणी उभारण्याचे प्रयत्न झाले. अनेक ठिकाणी दूरध्वनी, तारयंत्रे इ. दळणवळणाची साधने उद्‌ध्वस्त करण्यात आली आणि रस्ते व रेल्वेवाहतुकीत जागोजागी अडथळे निर्माण केले गेले. परंतु धरपकड, लाठीमार आणि गोळीबार यांपुढे नि:शस्त्र जनता फार काळ टिकाव धरू शकली नाही. अनेक शहरे मुक्त करण्यात आली परंतु २४ तासांतच सरकारने पुन्हा ती ताब्यात घेतली. बंगाल आणि बिहारमध्ये अनेक खेडी मुक्त केली गेली. तेथे तीन-चार महिन्यांपर्यंत सरकारी यंत्रणा बंद पडली आणि जनतेनेच कारभार हाती घेऊन चालविला. याला अपवाद फक्त महाराष्ट्रातील सांगली-सातारा विभाग होता. तेथे यशवंतराव चव्हाण, नाना पाटील, किसन वीर, लाडबंधू, वसंतराव पाटील यांसारख्या नव्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली व ती १९४५ पर्यंत व्यवस्थितपणे कार्य करीत होती. या आंदोलनात यशवंतराव चव्हाणांनी कारागृहवास लवकर पत्करला परंतु इतर कित्येकजण भूमिगत होऊन आंदोलन चालवीत राहिले. ठिकठिकाणी गावठी बाँबचे कारखाने निघाले. १९४४ अखेरीस तर वाळव्याच्या नागनाथ नायकवडींनी सशस्त्र फौज उभारण्याचा मोठा प्रयत्न केला.

     या लढ्यास फक्त फॉर्वर्ड ब्लॉकने पाठिंबा दिला होता. देशातील इतर सर्व पक्ष काही ना काही कारण काढून लढ्यापासून दूर राहिले. काँग्रेस समाजवादी पक्षाचे बहुतेक नेते भूमिगत झाले आणि त्यांनी लढ्यास एकसूत्रता आणण्यासाठी मार्गदर्शन केले. जयप्रकाश नारायण, अच्युत पटवर्धन, अरुणा असफ अली, डॉ. राम मनोहर लोहिया यांनी देशव्यापी लढ्याचे नेतृत्व केले. अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्तेही भूमिगत झाले व त्यांनी लढ्यास चांगला हातभार लावला. मोठ्या शहरांतील विद्यार्थांनी उत्स्फूर्तपणे लढ्यात उडी घेतली. परिणामी स्वातंत्र्योत्तर काळात बेचाळीसच्या लढ्यात तावून सुलाखून निघालेल्या अनेक विद्यार्थी नेत्यांना राजकारणात मोठे स्थान प्राप्त झाले.

     छोडो भारत आंदोलनाची उग्रता भयंकर होती. पोलीस व सैनिकी तुकड्यांनी एकूण ६६९ वेळा गोळीबार केला. त्यांत १,०६० वीरांच्या आहुती पडल्या आणि २,१७९ जण जखमी झाले. लाठीहल्ल्यातील जखमींची संख्या याहून कितीतरी पट अधिक होती. क्षुब्ध जमावांनी २०८ पोलीस ठाणी, ९४५ पोस्ट आणि टपाल कचेऱ्या व इतर ७५० सरकारी इमारती उद्‌ध्वस्त केल्या. ३८२ रेल्वे स्थानकांची नासधूस झाली आणि हजारेक ठिकाणी रूळ उखडण्यात आले. ४७४ ठिकाणी रस्त्यांची वाहतूक बंद पाडण्यात आली. ६६४ ठिकाणी बाँबस्फोट झाले. अनेक सरकारी कर्मचारी आणि गोरे सैनिक ठार किंवा जखमी झाले. उषा मेहता आणि ठक्कर यांनी अनेक महिने स्वतंत्र भारताचे नभोवाणी केंद्र गुप्तपणे चालविण्यात यश मिळविले. लढ्याचे लोण खेड्यापाड्यांतही पसरले होते. त्यामुळे एकूण १७३ गावांवर ९० लाखांहून अधिक रुपये सामुदायिक दंड बसविण्यात आला. हजारो स्वातंत्र्य-सैनिकांची धरपकड झाली आणि त्यांपैकी २,५६२ जणांना फटक्याच्या शिक्षाही झाल्या. आंदोलन अल्पकाळ टिकले परंतु त्याची उग्रता एवढी होती की, पुन्हा आंदोलन झाले तर ते किती भयंकर होईल, याची ब्रिटिश सरकारला खात्री पटली. आंदोलन फसल्यामुळे देशाचे विभाजन जरी टळू शकले नाही, तरी स्वराज्य अटळ झाले ही गोष्ट निश्चित.

--नगरकर, व. वि.
----------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विश्वकोश.मराठी.गोव.इन)
                 ------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.08.2023-बुधवार.
=========================================