नागपंचमी-लेख-10

Started by Atul Kaviraje, August 21, 2023, 04:37:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "नागपंचमी"
                                       -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२१.०८.२०२३-सोमवार आहे. आज "नागपंचमी" आहे. श्रावण महिन्यात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. यासोबतच काल सर्प दोषाने पीडित लोकही पूजा करून दोष दूर करतात. महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे. तसेच श्रीविष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते. श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना नागपंचमी सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया नागपंचंमीवर महत्त्वाचा लेख. 

              या दिवशी काय करावे?--

या दिवशी मातीची नागाची मूर्ती आणावी आणि त्याची पूजा करावी किंवा भिंतीवर नागाचे चित्र काढून त्याची पूजा करावी.
या दिवशी कडक उपवास करून पूजा आणि अभिषेक केल्याने घरामध्ये सुख, शांती आणि आरोग्य लाभते.
या दिवशी आपण नागाची पूजा केल्यामुळे या रूढी, परंपरा पुढच्या पिढीला समजतात आणि त्या तशाच पुढे चालवल्या जातात.
या दिवशी यथासांग पूजा करून मंत्राचा जप करावा.
या दिवशी सात्विक भोजनाचा आहारामध्ये समावेश करावा.
या दिवशी काय करू नये?
या दिवशी शेतातील कोणतेही काम करू नये.
या दिवशी कोणतीही झाडे तोडू नयेत.
या दिवशी जेवण करताना काहीही चिरू नये, तसेच पदार्थ तळू नयेत.
लोखंडी भांड्यामध्ये किंवा तव्यामध्ये कोणतेही पदार्थ शिजवले जाऊ नयेत.
शिवणकामाविषयी कोणतेही काम करू नये.
या दिवशी मांस, मटन तसेच मदयाचा आहरात समावेश करू नये.

             पूजा साहित्य –

ताम्हण, पळी, पंचपात्रे,घंटा, हळदी कुंकवाचा करंडा, अक्षता, विडा, नारळ, तांदूळ, फुले, बेल, दूध, लाह्या, जानवे जोड, अगरबत्ती, धूप, निरंजन, समई, पाट, गुळ किंवा साखर, चंदन, रांगोळी, कापसाचे वस्त्र इत्यादी

            पूजाविधी – (POOJA OF NAGPANCHAMI)--

सर्वप्रथम घरातील देवाची पूजा करून घ्यावी.
त्यानंतर एका पाटावर अक्षता ठेवून मातीच्या नागाच्या मूर्तीची स्थापना करावी.
पाटाभोवती रांगोळी काढून घ्यावी.
उजव्या बाजूला समय पेटवून घ्यावी.
नंतर एका बाजूला गणेश पूजन करून घ्यावे.
पाटाजवळ विडा ठेवावा. नागाला जानवे जोड घालावे.
नंतर नागाला दुधाचा अभिषेक करावा.
त्यानंतर हळद, चंदन लावून अक्षता वाहून फुले, बेल आणि कापसाची वस्त्रे वहावीत.
नंतर लाह्या आणि दुधाचा नैवेद्य दाखवावा.
घंटा वाजवून निरांजन आणि अगरबत्ती ने ओवाळावे.
नंतर देवाला धूप दाखवून नागदेवतेचा मंत्र म्हणून कथा वाचावी.
नंतर आरती करून घरातील नैवेद्य दाखवावा.

             पूजेची सांगता –

संध्याकाळी ०५.०० च्या दरम्याने नाग देवाची पुन्हा पूजा करावी.
त्यानंतर पूजेमध्ये काही राहून गेल्यास तशी क्षमा मागून आशीर्वाद घ्यावा.
प्रार्थना करावी.
यानंतर उत्तरपूजेची अक्षता वाहून नाग देवाला विसर्जनसाठी घेऊन जावे.
जाताना निर्माल्य सुद्धा पाण्यात सोडावे.
सगळ्यांना प्रसाद वाटप करावे.

               नागपंचमी आणि सापांवरील अन्याय –

     हा सण प्राणी आणि निसर्ग याबाबत बाबतीत कृतज्ञता व्यक्त करायला लावणारा असा आहे. नाग हा प्राणी शेतातील किडे, बेडूक आणि उंदीर खाणारा आहे. म्हणून याला शेतकऱ्याचा मित्र देखिल संबोधले जाते. याबाबत कृतज्ञता म्हणून हिंदू धर्मातील पवित्र सण साजरा केला जातो. परंतु नागाला पकडून त्याचे दात काढले जातात. आणि त्याला टोपलीत घालून घरोघरी त्याचे दर्शन घेऊन उदरनिर्वाहासाठी पैसे कमवणारी आदिवासी, गारुडी लोक नागपंचमीच्या वेळी हमखास फिरतात. हा नागांवरील अन्याय आहे. याबाबत सामाजिक संघटना, नैसर्गिक प्राणी मित्र संघटना यांनी आवाज उठवून प्राणी संवर्धन आणि संरक्षण कायदा केला आहे. त्यामुळे आता या गोष्टीला, धंद्याला सरकारने कायमस्वरूपी बंदी केलेली आहे.

             नागपंचमी पदार्थ –

     या दिवशी चिरणे, कापणे निषिद्ध असते. त्यामुळे नैवेद्य करताना जास्त करून उकडलेले किंवा शिजवलेले असे पदार्थ केले जातात. यामध्ये पुरणाचे दिंड, हळदीच्या पानातल्या पातोळ्या, मोदक, खीर यासारखे पारंपारिक आणि झटपट, घरच्या घरी केले जाणारे पदार्थ या दिवशी केले जातात.

--by Team Marathi Zatka
----------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी झटका.कॉम)
                      --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.08.2023-सोमवार.
=========================================