झेप (२०२३ चांद्रयान ३)

Started by mkapale, August 24, 2023, 06:26:52 PM

Previous topic - Next topic

mkapale

झेप (२०२३ चांद्रयान ३)

अनेक हात अन विचार आले जुळून
पडलो एकदा पण मोडलो नाही
योजना आखली झोका घेत जाण्याची
निर्धार हा, कि चूक करायची नाही

कोणी केली टीका कोणी हिम्मत दिली
काही झाले तरी जिद्द सोडायची नाही
किती तरी टप्पे, किती तरी उलाढाली
गणित ह्यावेळी बिघडवू द्यायचं नाही

शिल्पकाराने घडवले संगणकाने चालवले
नजरअंदाज एकही गोष्ट झाली नाही
शेवटचा टप्पा गाठतांना आठवला भूतकाळ
ह्यावेळी मात्र वाट कुठेही चुकली नाही

कल्पनेतला चंद्र आता आवाक्यात आहे
स्पर्श झालाय , केवळ दुरून दर्शन नाही
प्रगतीचे पंख घेत झेप घेतली पुन्हा आता
नजर कोणाचीही ह्यावेळी मात्र लागली नाही

कविकल्पना आणि सत्यातले अंतर पुसले
विकसनशील असलो तरी मागे नाही
झेप हि अवघे गगन छोटे पाडणारी आहे
अवकाशापुढे आकांक्षा कमी पडणार नाही