धर्मवीर आनंद दिघे साहेब पुण्यतिथी-लेख-3

Started by Atul Kaviraje, August 26, 2023, 10:01:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            "धर्मवीर आनंद दिघे साहेब पुण्यतिथी"
                           ---------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२६.०८.२०२३-शनिवार आहे. आज "धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची पुण्यतिथी" आहे. मराठी लोकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारा विरोधात आवाज उठविण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेनेच्या आक्रमकतेमुळे लवकरच हा पक्ष लोकांच्या पसंतीस उतरला. बाळासाहेब म्हणत शिवसेना सांभाळली ती सामान्य कार्यकर्त्यांनी. सामान्य कार्यकर्ता हाच शिवसेनचा कणा राहिला आहे. आणि याच कार्यकर्त्यांपैकी एक होते आनंद दिघे. वाचूया, साहेबांवर एक महत्त्वाचा लेख.

     धर्मवीर हे बिरूद ज्या नेत्याच्या नावापुढे लागलं तो एकमेव नेता म्हणजे आनंद दिघे. आनंद दिघे यांची आज पुण्यतिथी आहे. आनंद दिघे यांचा मृत्यू आजच्याच दिवशी म्हणजेच २६ ऑगस्ट २००१ ला झाला. त्यांच्या मृत्यूला २१ वर्षे होऊन गेली आहेत तरीही त्यांचा मृत्यू अपघातामुळे झाला की तो घातपात होता हे कोडं अद्यापही कायम आहे.

      शिवसेना वाढवण्यात आणि मोठी करण्यात आनंद दिघे यांचा सिंहाचा वाटा--

     ठाणे जिल्हा प्रमुख या पदावर असलेले आनंद दिघे यांनी शिवसेना वाढवली, मोठी केली. खेडेगावांपर्यंत शिवसेना नेली. शिवसेना गावागावांमध्ये आदिवासी पाड्यांमध्ये वाढवण्याचं श्रेय जातं ते त्यांनाच. आनंद दिघे यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर वाढली होती. इतकंच नाही तर आनंद दिघे हे ठाणेकरांसाठी देवच झाले होते. ठाण्यातल्या टेंभी नाका भागात त्यांचं प्रति न्यायालय भरत असे. त्यांचे किस्से आजही ठाण्यात सांगितले जातात.

             बाळासाहेब ठाकरेंच्या एकदम जवळचे होते आनंद दिघे--

     शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक आनंद दिघे होते. बाळासाहेब ठाकरे हे कायमच आनंद दिघे यांचं कौतुक करायचे. आनंद दिघे यांनी ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर काम केलं होतं शिवसेना हा पक्ष ठाणे जिल्ह्यात मोठा करण्याचं श्रेय जातं ते आनंद दिघे यांनाच. बाळासाहेब ठाकरे हे आनंद दिघेंनी ठाण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहात असत. मग ते नवरात्र उत्सव असो किंवा इतर कुठलाही पक्षाचा कार्यक्रम. आनंद दिघे हे त्यांच्या विद्यार्थी दशेपासूनच शिवसेनेत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता.

              आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आला सिनेमा--

     आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित असलेला एक सिनेमा मे महिन्यात आपल्या भेटीला आला होता. त्या सिनेमाचं नाव होतं धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे. या सिनेमात प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. हा सिनेमाच पुढे होणाऱ्या राजकीय भूकंपाची नांदीही ठरला. १३ मे २०२२ ला हा सिनेमा आला होता. त्यानंतर जून महिन्यात राज्यात राजकीय भूकंप झाला. आनंद दिघे यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेत बंड पुकारलं. त्यापुढे काय घडलं ते महाराष्ट्राला माहित आहेच.

     धर्मवीर या सिनेमाच्या वेळीही आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत चर्चा झाली. त्यांचा मृत्यू अपघात होता की घातपात हे कोडं आजही उलगडलेलं नाही. धर्मवीर या सिनेमाचा शेवटही हेच वास्तव सांगून जाणारा होता. एक पत्रकार आनंद दिघे यांच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो हे सिनेमात दाखवण्यात आलं आहे.

--BY मुंबई तक
--------------

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मुंबई तक.इन)
                        --------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.08.2023-शनिवार.
=========================================