श्रीकृष्ण जयंती-कविता-16-श्रीकृष्ण सखा सांगा कोणाचा..?

Started by Atul Kaviraje, September 06, 2023, 06:08:24 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                     "श्रीकृष्ण जयंती"
                                    ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०९.२०२३-बुधवार आहे. आज "श्रीकृष्ण जयंती" आहे. शास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्म रात्री १२ वाजता रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. त्यानुसार गृहस्थ जीवन जगणारे भक्त ६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्णाची जयंती साजरी करतील. मथुरेतही जन्माष्टमी ६ सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्राचा संयोगही असतो. हिंदी पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3.37 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.14 वाजता समाप्त होईल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असल्याने जन्माष्टमी उत्सव रात्री साजरा केला जातो. त्यामुळे जन्माष्टमीची तारीख 7 सप्टेंबर मानली जाईल. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना श्रीकृष्ण जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया एक कविता.

                           "श्रीकृष्ण सखा सांगा कोणाचा..?"
                          ------------------------------

श्रीकृष्ण सखा सांगा कोणाचा..?

नऊ महिने पोटी सांभाळून जन्म देणाऱ्या देवकी मातेचा तान्हा की
आपले दुध पाजवून वाढवणाऱ्या यशोदा मैयाचा कान्हा..?


श्रीकृष्ण सखा सांगा कोणाचा..?

भर पावसात यमुनेच्या पुरात मथुरेतून गोकुळात घेऊन जाणारा वासुदेव बाबांचा की
गोकुळात सांभाळ करणाऱ्या नंद बाबांचा..?


श्रीकृष्ण सखा सांगा कोणाचा..?

यमुनेच्या डोहात चेंडूसाठी उतरवणाऱ्या सवंगड्यांचा का
दही दुधाच्या हंड्या फोडून त्यांना खाऊ घालणाऱ्या गरीब मित्रांचा..?


श्रीकृष्ण सखा सांगा कोणाचा..?

दिवसभर रानात भटकून चरणाऱ्या गायी वासरांचा की
गोकुळातील प्रेम करणाऱ्या त्या गोप-गोपिकांचा..?


श्रीकृष्ण सखा सांगा कोणाचा..?

जीवनभर प्रेमिका बनुन राहणाऱ्या वत्सल राधेचा की
सुवर्णतुला करतांनी मंजीरा देणाऱ्या पवित्र तुळशीचा..?


श्रीकृष्ण सखा सांगा कोणाचा..?

स्वर्गातील पारिजातक वृक्षासाठी रुसणाऱ्या रुक्मिणीचा की
न मागताच वृक्ष मिळणाऱ्या सत्यभामेचा..?


श्रीकृष्ण सखा सांगा कोणाचा..?

बंदिवासातून मुक्त केलेल्या सोळा हजार एकशे महिलांचा की
वस्त्रहरण होतांना वस्त्र पुरवणाऱ्या द्रोपदी बहिणीचा..?


श्रीकृष्ण सखा सांगा कोणाचा..?

मूठभर पोह्यांसाठी सुवर्णाचे गाव देणाऱ्या गरीब सुदामाचा की
रणभूमीत युद्ध करणाऱ्या त्या वीर अर्जुनाचा..?


श्रीकृष्ण सखा सांगा कोणाचा..?

जीवनभर भक्ती रंगात न्हाऊन निघणार्‍या त्या मीराबाईंचा की
जीवन अर्पण करणाऱ्या कवी सुरदासांचा..?


श्रीकृष्ण सखा सांगा कोणाचा..?

श्रीकृष्ण सखा.. हा सर्वांचा.. माझा.. तुमचा.. आपल्या सर्वांचा..!

श्रीकृष्ण सखा.. हा सर्वांचा.. माझा.. तुमचा.. आपल्या सर्वांचा..!


--गणेश जी. शिवलाड
-------------------

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरीमिरर.कॉम)
                        -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2023-बुधवार. 
=========================================