दिन-विशेष-लेख-जागतिक ओझोन संरक्षण दिन-B

Started by Atul Kaviraje, September 16, 2023, 05:52:03 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                            "जागतिक ओझोन संरक्षण दिन"
                           ----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-16.09.2023-शनिवार आहे.  १६ सप्टेंबर-हा दिवस "जागतिक ओझोन संरक्षण दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

             ओझोन क्षयाचे गंभीर परिणाम--

     ओझोन थराचा क्षय झाल्याने त्यातून अतिनील किरणे पृथ्वीवर येऊ लागल्याने जीवसृष्टी प्रभावित होत आहे. ओझोन विवराचे गंभीर परिणाम मानव जातीला भोगावे लागत आहे. यात प्रामुख्याने कातडीचे रोग, त्वचा काळी पडणे, त्वचेचा कर्करोग, सुरकुत्या पडणे आदी विविध विकार होत आहे. अतिनील किरणांमुळे शरीरातील रोगप्रतिबंधक शक्ती कमी होत आहे. त्यामुळे गोवर, कांजिण्या, त्वचेवर चट्टे उमटविणारे विषाणूजन्य रोग होतात. रक्ताभिसरणात बिघाड होते. पेशींची अनियंत्रित वाढ होते. तसेच अतिनील किरणांमुळे वनस्पतीची प्रकाश संश्लेषणक्रिया मंदावते. पोषक द्रव्याचे प्रमाण कमी होते. वनस्पतीची वाढ खुंटते आणि उत्पादनक्षमता घटते. या अतिनील किरणामुळे समुद्रातील सूक्ष्म वनस्पती व प्राणी कमकुवत बनतात. परिणामतः समुद्री प्राण्यांची संख्या घटते.

             ओझोन सुरक्षा कवचाचे संरक्षण--

     १९८७ च्या मान्ट्रिअल करारामुळे ओझोन ऱ्हासाचे गांभीर्य रुजविण्याचे कार्य झाले. या करारामुळे ओझोन थरास हानिकारक ठरणाऱ्या पदार्थांच्या वापरात कमी करण्याचा उपाय सुचविण्यात आला. तसेच ओझोन थराबाबत सजगता निर्माण करण्यासाठी राष्ट्र संघटनेत १९९५ पासून १६ सप्टेंबर हा दिवस 'आंतराष्ट्रीय ओझोन दिन' साजरा करण्याचे ठरविण्यात आले. पर्यावरणावर होणारे विपरीत परिणाम जाणून घेतल्या जात आहे. ओझोनवर हल्ला चढवणाऱ्या सीएफसीला एचएफसीसारखी पर्यायी संयुगे शोधून काढण्यात आली. आता एसी, फ्रिज ही संयुगे सीएफसीमुक्त वापरण्याची गरज आहे. सीएफसी वायूचे प्रमाण कमी करावयाचे असल्यास वैयक्तिक वापरावरही नियंत्रण आणले पाहिजे.

             ओझोन थराच्या घनतेत सुधारणा--

     जागतिक क्लोरोफ्लोरोकार्बन उत्सर्जन कमी होत असताना अशा प्रकारची वाढ का होत होती, त्याची कारणमीमांसा सुरू झाली. बहुतेक प्रगत राष्ट्रांनी प्रगतिशील देशांकडे बोट दाखवण्यास सुरुवात केली. कदाचित काही राष्ट्रे क्लोरोफ्लोरोकार्बन उत्सर्जन माहिती लपवत असल्याच्याही चर्चा त्या दरम्यान झाली. २००५ नंतर पुन्हा ओझोनच्या जागतिक आणि ध्रुवीय घनतेत सुधारणा व्हायला सुरुवात झाली ती आजपर्यंत होत आहे, ही शास्त्रज्ञांना दिलासा देणारी बाब आहे. ओझोन थराच्या घनता नोंदी घेण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार १९६० पासून स्ट्रटोस्पिअरमधील ओझोन वायूचा घनतेतील बदलांचा आलेख पाहिला, तर काही बाबी स्पष्ट होतात. त्यांपैकी एक म्हणजे १९९८ पर्यंत ओझोन वायूच्या घनतेत सुधारणा झाल्याचे दिसते. परंतु १९९८ पासून जागतिक आणि ध्रुवीय ओझोन वायूच्या घनतेत हळूहळू परत घसरण होताना दिसते. २००० ते २००५ च्या दरम्यान त्यात कमालीची घसरण झाल्याचे दिसून आले.

              एकत्रित प्रयत्नांना यश--

     क्लोरोफ्लोरोकार्बन उत्सर्जनाने ओझोन थराचे नुकसान होत आहे. १९६० पासून हवेत क्लोरोफ्लोरोकार्बन उत्सर्जनाचे प्रमाण सतत वाढतच होते. १९८८ मध्ये सर्वाधिक एकूण १४.५ लाख टन इतका क्लोरोफ्लोरोकार्बन उत्सर्जित झाल्याची नोंद आहे. त्यानंतर मात्र क्लोरोफ्लोरोकार्बन उत्सर्जनात कमालीची घसरण दिसून आली आहे. २०१० मध्ये हवेत क्लोरोफ्लोरोकार्बन उत्सर्जन ३.८ लाख टन इतके कमी झाल्याचे दिसून आले. हे मुख्यत्वे आंतरराष्ट्रीय मॉन्ट्रियल नियामक कराराचा परिणाम आणि ओझोनचा क्षय घडून आणणाऱ्या पदार्थांचे उत्पादन व त्यांचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचा परिणाम मानल्या जाते. ओझोन थर ऱ्हास ही एक लढाई मानली तर जागतिक तापमानवाढ, नैसर्गिक स्रोतांचा झपाट्याने होत असलेला ऱ्हास अशा अनेक पर्यावरणीय समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. पर्यावरणीय समस्यांचे युद्ध आपल्या समोर आहे. त्याला शास्त्रशुद्ध विवेकाने सामोरे गेलेच पाहिजे.

--डॉ. माधवी गुल्हाने
------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-अग्रोवोन.कॉम)
                       ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.09.2023-शनिवार.
=========================================