श्रीगणेश चतुर्थी-कविता-8-गजानना

Started by Atul Kaviraje, September 19, 2023, 11:33:03 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                     "श्रीगणेश चतुर्थी"
                                    ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०९.२०२३-मंगळवार आहे. आज "श्रीगणेश चतुर्थी" आहे. गणेश चतुर्थी हा सण देशातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जातो. तथापि, हा सण सगळ्या जास्त महाराष्ट्रात साजरा केला जातो. गणेश चतुर्थी हा हिंदूंचा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे, जो दरवर्षी भाविक मोठ्या जोशाने आणि उत्साहाने साजरा करतात. हिंदू मान्यतेनुसार, गणेश चतुर्थी दरवर्षी भगवान गणेशाच्या वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना गणेश चतुर्थीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गणेश चतुर्थीवर कविता.

                                      "गजानना"
                                     -----------

कर्ता करविता, तू सुखदाता, गौरीच्या नंदना

रिद्धी सिद्धीच्या दाता दयाळा विनायका गजानना ।।धृ।।


मंगलमय तव रूप गणेशा, डोळा सुख देते

तुझ्या दर्शनाने आनंदाला किती उधाण येते

भावभक्तीने भजता होते पूर्ण मनोकामना ।।१।।


गणनायक तो कसा असावा सकलांना दावशी

तुझ्या रूपातून साऱ्या जगाला मार्गदर्शन करशी

एक एक अवयव दावितो नवीन अर्थ जना ।।२।।


भले बुरे जे कानी येते, योग्य तेच ऐकावे

निवडून घ्याया सुपासारखे कान असू द्यावे

म्हणून शोभते नाव शूर्पकर्ण तुजला गजवदना ।।३।।


उदरी लपवशी चुका गणांच्या नसे कधी गणती

विनायका, तुज म्हणून सारे लंबोदर म्हणती

बुद्धीची देवता, सुखदाता पावशी भक्तजना ।।४।।


अर्ध दात सांगतो, चालते बुद्धी कमी जराशी

दात पूर्ण सांगतो असावी श्रद्धा पूर्ण मनाशी

भावपूर्ण हृदयाने घडावी गणेशाची प्रार्थना ।।५।।

--पंडित वराडे
-------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
                       -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2023-मंगळवार.
=========================================