कविता मनातल्या-शेवटचे घरटे

Started by Atul Kaviraje, November 07, 2023, 10:11:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "कविता मनातल्या"
                                 ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया "कविता मनातल्या" या काव्य सदरI अंतर्गत, आई या विषयावर एक कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "शेवटचे घरटे"

                                   "शेवटचे घरटे"
                                  --------------

एक वार पंखावरूनी
फिरवु दे रे हात
शेवटचे घरटे माझे
माझ्याच अंगणात

मांजरीचे धार दात
नाही पिल्लांना टोचत
आईची ममता वेड्या
नाही साऱ्यांना दिसत
प्रेम कसं निरपेक्ष करावं
आता आलं रे ध्यानात
शेवटचे घरटे माझे
माझ्याच अंगणात

आठवणींनी रडतात पप्पा
डोकं लपवून उशीत
ये वेळ काढून कधी
अन् शिर रे तू कुशीत
तुला काय हवं नको
सांग तू मम्मीच्या कानात
शेवटचे घरटे माझे
माझ्याच अंगणात

जीवनाच्या धावपळीत काढला
तुझ्यासाठी खास वेळ
तुझ्या आमच्या मनाचा आता
सुटत चालला रे मेळ
जुळू पाहणारी मनं कशी
दूर गेली रे क्षणात
शेवटचे घरटे माझे
माझ्याच अंगणात

तुझ्या गोष्टी सांगत ऐकत
कसेबसे सरतो दिवस
रात्री तुझ्या पप्पांचा चेहरा
मला करतो रे उदास
तुला हाक मारत उठतात
विव्हळतात रे स्वप्नात
शेवटचे घरटे माझे
माझ्याच अंगणात

फडफडणारी ज्योत आता
जड जाते रे रात
येऊन जा भेटून जा रे
विझण्याआधी वात
अखेरचे ते सांगणे बोलणे
राहुन जाईल रे मनात
शेवटचे घरटे माझे
माझ्याच अंगणात

एक वार पंखावरूनी
फिरवु दे रे हात
शेवटचे घरटे माझे
माझ्याच अंगणात
माझ्याच अंगणात....

--डौ. सुभाष कटकदौंड
---------------------

            (साभार आणि सौजन्य-संदर्भ मराठी कविता मनातल्या.वर्डप्रेस.कॉम)
           -----------------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.11.2023-मंगळवार.
=========================================