काही गाणी आठवणीतली, काही साठवणीतली !-आजीची पैठणी

Started by Atul Kaviraje, November 10, 2023, 10:44:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                     "काही गाणी आठवणीतली, काही साठवणीतली !"
                    --------------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "काही गाणी आठवणीतली, काही साठवणीतली !" या गीत-मालिके-अंतर्गत, एक गीत. या गीताचे शीर्षक आहे- "आजीची पैठणी "

                                 "आजीची पैठणी"
                                ----------------

फडताळात एक गाठोडे आहे
त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे
कुंच्या टोपडी शेले शाली
त्यातच आहे घडी करुन
जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी
रंग तिचा सुंदर धानी

माझी आजी लग्नामध्ये
हीच पैठणी नेसली होती
पडली होती सा-यांच्या पाया
हाच पदर धरून हाती
पैठणीच्या अवतीभवती
दरवळणारा सुष्म वास
ओळखीची.. अनोळखीची..
जाणीव गुढ़ आहे त्यास

धूर कापूर उदबत्यांतून
जळत गेले किती श्रावण
पैठणीने जपले
एक तन.. एक मन..
माखली बोटे
पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची चमेलीची
आरास पदराआडून हसली

वर्षामागुन वर्षे गेली
संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत
एक मऊपणा ल्याला
पैठणीच्या घडीघडीतून
अवघे आयुष्य उलगडत गेले
अहेवपणी मरण आले
आजीचे माझ्या सोने झाले

कधीतरी ही पैठणी
मी धरते ऊरी कवळुन
मऊ रेशमी स्पर्शामध्ये
आजी भेटते मला जवळुन
मधली वर्षे गळुन पडतात
कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यानो
आजीला माझ्या कुशल सांगा.

(वरील कविता माझ्या बाबांनी सांगितली आणि मी लिहून घेतली, त्यात काही चुका असण्याची शक्यता आहे. काही चूक सापडल्यास कृपया कळवावे.)
---------------------------------------------------------------------
--शांता शेळके 
-------------
--प्रकाशक : शंतनू देव
---------------------

                   (साभार आणि सौजन्य-माणिक-मोती.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-♫ गाणीमराठी.com ♫♪)
                  -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.11.2023-शुक्रवार.
=========================================