दिन-विशेष-लेख-भाषिक सुसंवाद दिन

Started by Atul Kaviraje, November 21, 2023, 09:21:57 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "दिन-विशेष-लेख"
                               "भाषिक सुसंवाद दिन"
                              ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-21.11.2023-मंगळवार आहे. २१ नोव्हेंबर, हा दिवस "भाषिक सुसंवाद दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     भारताच्या अन्य भागातील लोकांच्या भाषेच्या वारसाचा परिचय करुन देण्याच्या दृष्टीने २१ नोव्हेंबर हा दिवस `भाषिक सुसंवाद दिवस` म्हणून साजरा केला जाईल. विशेष वाङमयीन कार्यक्रम व कवी संमेलनाचे आयोजन या दिवशी केले जाईल. 21 नोव्हेंबर हा दिवस दुर्बल घटक दिवस असेल.

         राज्यात १९ ते २५ नोव्हेंबरदरम्यान 'कौमी एकता सप्ताह'; काय आहे तो ?--

     राज्यात १९ ते २५ नोव्हेंबर हा सप्ताह 'कौमी एकता सप्ताह' म्हणून राज्यात साजरा करण्यात येणार असून त्यामध्ये आयोजित करावयाच्या विविध कार्यक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अल्पसंख्याक विकास विभागामार्फत करण्यात आले आहे. हा सप्ताह साजरा करण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. कोविड – १९ विषाणूच्या संसर्गाची पार्श्वभूमी विचारात घेता लोकसहभागाबाबत योग्य खबरदारी घेऊन कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, असे सूचित करण्यात आले आहे. शुक्रवार १९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा करण्यात येईल. धर्मनिरपेक्षता, जातीयवादी विरोध व अहिंसा यांच्यावर भर देणारे सभा, चर्चासत्रे व परिसंवाद ऑनलाईन किंवा वेबिनार इत्यादी पद्धतीने आयोजित करावेत. शनिवार २० नोव्हेंबर रोजी अल्पसंख्याक कल्याण दिवस साजरा करण्यात येईल. अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी १५ कलमी कार्यक्रमांवर भर देण्यात यावा, असे सूचित करण्यात आले आहे.

     रविवार २१ नोव्हेंबर रोजी भाषिक सुसंवाद दिवस साजरा करण्यात येईल. भारताच्या अन्य भागातील लोकांच्या भाषेच्या वारसाचा परिचय करून देण्याच्या दृष्टीने ऑनलाईन, वेबिनार इत्यादी पध्दतीने विशेष वाङमयीन कार्यक्रम व कवी संमेलने आयोजित करण्यात यावीत. सोमवार २२ नोव्हेंबर रोजी दुर्बल घटक दिवस साजरा करण्यात येईल. २० कलमी कार्यक्रमाअंतर्गत अनुसूचित जाती व जमातीमधील व्यक्ती व कमकुवत घटकातील व्यक्ती यांना मदत करण्यासाठी ठरवून दिलेले कार्यक्रम ठळकपणे निदर्शनास आणण्याच्या दृष्टीने कार्यक्रम आयोजित करावेत, असे सूचित करण्यात आले आहे.

     मंगळवार २३ नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक एकता दिवस साजरा करण्यात येईल. भारतीयांच्या विविधतेतील एकतेवर भर देणारे आणि सांस्कृतिक संरक्षण व एकात्मता संबंधाची भारतीय परंपरा सादर करणारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. बुधवार २४ नोव्हेंबर रोजी महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. भारतीय समाजातील महिलांचे महत्व व राष्ट्र उभारणीच्या विकासामधील त्यांची भूमिका यावर भर देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. गुरुवार २५ नोव्हेंबर रोजी जोपासना दिवस साजरा करण्यात येईल. पर्यावरणाची जोपासना व त्याची जाणीव यासाठीच्या वाढत्या गरजेवर भर देणारे मेळावे व कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. हे सर्व कार्यक्रम आयोजित करताना केंद्र व राज्य शासनाच्या कोव्हीड – १९ च्या संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाईल याची दक्षता घ्यावी, असे सूचित करण्यात आले आहे.

     यावर्षी 19 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घ्यावयाची आहे. या शपथेचा नमुना परिपत्रकाद्वारे सर्वांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या सर्व कार्यालयातून ही शपथ घेण्याचा कार्यक्रम राबविण्यात यावा. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जागेवर उभे राहून, प्रांगणात सामाजिक अंतर ठेऊन राष्ट्रीय एकात्मकतेची शपथ घ्यावी. तसेच भित्तीपत्रके, फलक यांच्यावर ठसठशीत असे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिकचिन्ह प्रदर्शित करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळा बंद असल्याने तेथे यावर्षी कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. स्वयंसेवी संस्थांनी करावयाचे कार्यक्रम त्यांच्या सोयीने करण्याची त्यांना मोकळीक आहे.

     राष्ट्रीय एकात्मतेवर नेत्यांची भाषणे, राष्ट्रीय एकात्मतेची शपथ सामूहिकरित्या घेणे, सांस्कृतिक कार्यक्रम करणे, राष्ट्रगीताचे सामूहिक गायन आदी कार्यक्रम आयोजित करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रात सर्व संबंधितांची मदत घेऊन हा कार्यक्रम त्यांच्या विविध माध्यमातून आखला जाईल व यशस्वी केला जाईल असे पहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

            राष्ट्रीय एकात्मता शपथ--

     "मी गांभीर्यपूर्वक शपथ घेतो/ घेते की, देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी मी निष्ठापूर्वक काम करीन" मी अशीही प्रतिज्ञा करतो/ करते की, मी कधीही हिंसाचाराचा अवलंब करणार नाही. तसेच मी सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे किंवा इतर राजकीय वा आर्थिक गाऱ्हाणी शांततामय आणि सांविधानिक मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न चालू ठेवीन.

--by India Darpan
---------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इंडिया दर्पण लाईव्ह.कॉम)
                 -------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.11.2023-मंगळवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================