दिन-विशेष-लेख-उत्क्रांती दिन-A

Started by Atul Kaviraje, November 24, 2023, 09:38:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "दिन-विशेष-लेख"
                                   "उत्क्रांती दिन"
                                -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-24.11.2023-शुक्रवार आहे.  २४ नोव्हेंबर, हा  दिवस "उत्क्रांती दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत--(लेख क्रमांक-१)

     उत्क्रांती (इंग्लिश: Evolution, इवोल्यूशन) म्हणजे निसर्गानुसार सजीवांमध्ये होणारे आणि खूपच हळूहळू अंगिकारले जाणारे बदल होय. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून होत आलेले हे बदल सजीवांच्या उदयास अनुकूल होते. चार्लस डार्विन हे उत्क्रांती सिद्धांताचे जनक मानले जातात.

            उत्क्रांती ( Evolution)--

     उत्क्रांती म्हणजे क्रमविकास. जीवसृष्टीत अविरत घडत राहणारी बदल-प्रक्रिया. या प्रक्रियेतून लाखो वर्षांच्या कालावधीत आदिजीवांमध्ये बदल होऊन अतिप्रगत प्राणी आणि वनस्पती उत्पन्न झाले आहेत. उत्क्रांती (क्रमविकास) कशी घडून आली, हा आजही चर्चेचा विषय आहे; परंतु उत्क्रांती घडली हे वैज्ञानिक सत्य आहे. जीववैज्ञानिकांच्या मते, सर्व सजीव दीर्घकाळ घडून आलेल्या भौतिक आणि रासायनिक प्रक्रियांद्वारे झालेल्या बदलातून निर्माण झालेले आहेत.

     उत्क्रांतीचा सबळ पुरावा खडकात आढळणार्‍या सजीवांचे मृत अवशेष किंवा त्यांच्या जीवाश्मांवरून मिळतो. तसेच जिवंत प्राणी व वनस्पती यांच्या तौलनिक अभ्यासावरून उत्क्रांतीबाबत अधिक पुष्टी मिळते. तौलनिक अभ्यासात सजीवांची संरचना, गर्भविज्ञान आणि भौगोलिक वितरण यासंबंधी तुलना केली जाते.

     सजीवांमध्ये काही असे बदल घडून येतात, की त्यामुळे त्यांची पर्यावरणाशी अनुकूलता वाढते. त्यांची बदलत्या परिस्थितीत टिकून राहण्याची, प्रजननाची क्षमता वाढते. उत्क्रांती कोणत्याही एका दिशेने किंवा विशिष्ट हेतूने घडून येत नाही. सध्या सजीवांच्या अंदाजे २० लाख जाती अस्तित्वात आहेत; परंतु असा अंदाज आहे की आतापर्यंत निर्माण झालेल्या जातींपैकी सु. ९९.९% जाती अस्तंगत झालेल्या आहेत आणि सु. २०० कोटी जाती मागील ६० कोटी वर्षांत उत्पन्न झाल्या आहेत.

     काही जाती त्यांच्या तत्कालीन पर्यावरणाशी योग्य प्रकारे अनुकूलित न झाल्यामुळे नष्ट होतात. काही जाती अनुकूलित होतात आणि त्यांची संख्या वाढत जाते. सजीव समुदायामध्ये झालेला हा बदल टिकून राहणे किंवा झालेल्या बदलामुळे सजीव नष्ट होणे यालाच 'नैसर्गिक निवडी'चा निकष म्हणतात. या निकषानुसार, निसर्गच सजीवांच्या एखाद्या जातीला नाकारतो किंवा स्वीकारतो. ज्याच्यामध्ये जनुकीय स्तरावर, वंशागत विविध बदल होत आहेत अशा सजीवांच्या समुच्चयावर जेव्हा नैसर्गिक निवडीचा परिणाम होतो, तेव्हा सामान्यपणे उत्क्रांती घडून येते. प्रयोगशाळेबाहेर नैसर्गिक निवड प्रत्यक्षात कशी घडते हे वैज्ञानिकांनी दाखवून दिले आहे. जेव्हा त्यांनी वेगळ्या पर्यावरणात, जेथे वेगळे परभक्षी होते, अशा पाण्यात गपी मासे सोडल्यानंतर गपी माशांच्या प्रजननपद्धतीत बदल होतो, असे ११ वर्षांच्या संशोधनातून आढळले आहे.

           नवीन जातींची उत्पत्ती--

     आंतरप्रजननाची क्षमता असलेला आणि फलनक्षम संतती निर्माण करू शकणार्‍या सजीवांच्या गटाला जाती म्हणतात. एका जातीमध्ये बदल होऊन दुसरी जात उत्पन्न झाल्याने किंवा एका जातीपासून दोन जाती निर्माण झाल्याने नवीन जातींची उत्पत्ती होते. ज्या जातींमध्ये लैंगिक प्रजनन घडून येते, त्या जातींमध्ये प्रजननाच्या दृष्टीने जातीचे वेगळेपण राखणारे घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. या घटकांमुळे एकाच अधिवासात राहणार्‍या भिन्न जातींना समागम करण्यापासून रोखले जाते. उदा., पक्ष्यांच्या अनेक जातींमध्ये प्रणयाच्या जातीविशिष्ट रुढी असतात आणि एक जातीची मादी दुसर्‍या जातीच्या नराला प्रणयासाठी प्रतिसाद देत नाही. काही वेळा दोन वेगवेगळ्या जातींमध्ये समागम होतो. मात्र, त्यातून निर्माण झालेली संतती जगत नाही किवा प्रजननक्षम नसते. उदा., घोडी आणि गाढव यांच्यापासून जन्मलेले खेचर वांझ असते.

     नवीन जातीची उत्पत्ती जेव्हा होते, तेव्हा बहुधा एखादी जाती भौगोलिक कारणामुळे दोन किंवा अधिक वेगवेगळ्या गटांत विभागली जाते. उदा., वर्षानुवर्षे चाललेल्या खंडांच्या हालचालींमळे तसेच हिमखंड, नदी आणि अन्य कारणांमुळे अधिवासात विभागणी झाल्यामुळे जमिनीवरील जातींचे भौगोलिक विलगीकरण घडून येते.

     काही काळानंतर, विलग झालेल्या सजीवांच्या गटात वेगळ्या प्रकारचे बदल होतात; कारण त्यांचे पर्यावरण वेगळे असते आणि प्रत्येक गटात घडून आलेली उत्परिवर्तने वेगळी असतात. जर भौगोलिक विलगीकरण दीर्घकाळ चालू राहिले तर दोन्ही गटांमध्ये एवढे भेद दिसतात की प्रत्येक गट नवीन पर्यावरणाशी पूर्णपणे अनुकूलित होते किंवा त्या गटात प्रजननाच्या दृष्टीने वेगळेपण निर्माण होते. अशा स्थितीत, ते गट एकमेकांसोबत प्रजननाची क्षमता गमावतात. या दोन्ही परिस्थितीमध्ये. भिन्न जाती निर्माण होतात.

     जातीउद्भव होण्यास काही वेळा लाखो वर्षे लागतात; परंतु बहुतेक वेळा ते वेगाने घडते. एखाद्या नवीन निमर्नुष्य बेटावर एखादी जाती नवीन अधिवासात स्थिर झाल्यानंतर खासकरुन ते वेगाने घडत असावे. अशी जाती तेथे मूळची झाल्याने तीत जनुकीय अपवहन (ड्रिफ्ट) होत असावे. तसेच वेगळे हवामान किंवा अन्नसाठा इत्यादी नैसर्गिक निवडीचे घटक कारणीभूत ठरत असावेत, असे मानतात. काही प्रसंगी, गुणसूत्रांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे देखील नवीन जाती निर्माण होऊ शकतात.

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विकास पीडिया.इन)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.11.2023-शुक्रवार.
=========================================