दिन-विशेष-लेख-स्वदेशी दिन-A

Started by Atul Kaviraje, December 12, 2023, 09:01:54 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "दिन-विशेष-लेख"
                                      "स्वदेशी दिन"
                                  ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-12.12.2023-मंगळवार आहे. १२ डिसेंबर, हा दिवस "स्वदेशी दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

           स्वदेशी आंदोलन--

     स्वदेशी आंदोलन : परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी छेडलेले आंदोलन. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विशिष्ट राजकीय व आर्थिक परिस्थितीत त्याला चालना मिळाली कारण अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात यूरोपमध्ये, विशेषतः इंग्लंडमध्ये, औद्योगिक क्रांती सुरू होऊन नव्या कारखान्यांत मोठ्या प्रमाणावर तयार होणार्‍या मालाला बाहेर बाजारपेठा मिळविणे आवश्यक होते. त्यातून कारखानदार कच्च्या मालासाठी परदेशांतील बाजारपेठा काबीज करू लागले. साहजिकच यूरोपीय राष्ट्रांत, विशेषतः ग्रेट ब्रिटनमध्ये कच्च्या मालाची उगमस्थाने व बाजारपेठा हस्तगत करण्यासाठी संघर्ष उद्भवला. त्यातून ग्रेट ब्रिटनमधून पक्का माल ( उदा., कापड ) भारतात येई व येथून कवडीमोल किंमतीला कच्चा माल  ( कापूस) ग्रेट ब्रिटनला जाई. तेव्हा या कापडावर बहिष्कार टाकण्याची मोहीम लोकहितवादी, सार्वजनिक काका, दादाभाई नवरोजी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांनी सुरू केली आणि स्वदेशी माल —विशेषतः खादीचे कापड — वापरण्यासाठी आग्रही भूमिका स्वदेशी आंदोलनाद्वारे व्यक्त केली. इतर यूरोपियन देशांप्रमाणे ब्रिटिशही भारतात व्यापार करण्यासाठी आले. भारताची बाजारपेठ आपल्या ताब्यात कायम राहावी म्हणून ब्रिटिशांनी येथे राज्य स्थापून स्वतःसाठी फायदेशीर अशी धोरणे आखली. इंग्लंडच्या कारखान्यांतील माल सुबक व स्वस्त असे. भारतातील हातमाग उद्योगाशी स्पर्धा करता यावी यासाठी जकात, मजुरी व इतर अनेक बाबतींत तेथील कारखानदारांसाठी ब्रिटिश शासनाने अनुकूल धोरणे स्वीकारली. यामुळे भारतीय उद्योगधंदे बुडू लागले, कारागीर बेरोजगार होऊन त्यांचे व पर्यायाने एकंदर समाजाचे दारिद्य्र वाढू लागले. ही घसरगुंडी थांबवायची असेल, तर भारतीयांनी भारतातच तयार झालेला माल वापरावा, असे धोरण काही जणांनी पुरस्कारिले. स्वदेशी माल महाग असे. तो जाडाभरडा असला, तरी देशाच्या व्यापक हिताच्या दृष्टीने तोच वापरला पाहिजे, असा प्रचार स्वदेशीचे पुरस्कारकर्ते करू लागले. पुढे टिळकांनी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चतुःसूत्रीत स्वदेशी मालाचा स्वीकार व परदेशी मालावर बहिष्कार या कार्यक्रमांचा अंतर्भाव केला आणि आपली उन्नती करून घ्यावयाची ती 'स्वदेशी' आणि 'बहिष्कार' यांसारख्या मार्गांनीच केली पाहिजे, असे निक्षून सांगितले. तत्पूर्वी १८९४—९६ च्या इंग्रजांच्या जकातविषयक धोरणामुळे साम्राज्यशाही शोषणाचे स्वरूप अधिक स्पष्ट झाले होते. त्यामुळे स्वदेशीला जनतेचा पाठिंबा वाढत गेला.

     १९०६ मध्ये तत्कालीन व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी करण्याचा घाट घातला. त्याविरुद्ध बंगालमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. टिळकांनी या प्रश्नाला अखिल भारतीय स्वरूप प्राप्त करून दिले. ब्रिटिश शासनाविरुद्धची चळवळ तीव्रतर बनविली पाहिजे, अशी जाणीव काँग्रेसच्या बहुतेक पुढार्‍यांना झाली. कलकत्ता येथे झालेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात (१९०६) दादाभाई नवरोजी यांनी अध्यक्षपदावरून स्वदेशीचा पुरस्कार केला आणि अधिवेशनात संमत झालेल्या ठरावातही 'स्वदेशी' व 'बहिष्कार' यांचा अंतर्भाव करण्यात आला. या आंदोलनात जमीनदार व वकिलांसोबत विद्यार्थी, शेतकरी, दुकानदार, एतद्देशीय सैनिक, पुजारी, नाभिक, परीट इत्यादींनी सहभागी होऊन परदेशी मालावर बहिष्कार तर टाकलाच पण इंग्लिश समाजा-बरोबरचे रोटीबेटी व्यवहारसुद्धा बंद केले. विद्यार्थ्यांच्या चिथावणीला पायबंद घालण्यासाठी ब्रिटिश शासनाने शैक्षणिक संस्थांना अशा विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच स्थानिक जमीनदारांवरही दबाव आणला. मुसलमानांना काही सवलती देऊन हिंदूंविरुद्ध चिथविले. शिवाय मिरवणुका, सभा आणि वृत्तपत्रे यांवर काही निर्बंध घातले. अखेरचे अस्त्र म्हणून आंदोलन मोडण्यासाठी चौकशी- शिवाय नेत्यांना तुरुंगात डांबण्याचे सत्र ब्रिटिशांनी अवलंबिले तथापि स्वदेशी आंदोलक डगमगले नाहीत. त्यांनी परदेशी कापड, मीठ, साखर इत्यादींवरील बहिष्कार चालू ठेवला. त्यांनी शपथपूर्वक इंग्रजी भाषेचा त्याग केला. शासकीय मंडळे आणि समित्यांतून अनेक निष्ठावान नेते राजीनामा देऊन बाहेर पडले. एवढेच नव्हे, तर इंग्रजांची कोणतीही सेवा वा नोकरी करायची नाही, असे कार्यकर्त्यांनी ठरविले. जो कोणी इंग्रजांना मदत करील, त्याच्याकडे समाज उपहासात्मक दृष्टीने पाहू लागला. या काळात सरकारी शिक्षण हे शासकीय नोकर बनविणारे असल्याने त्याऐवजी राष्ट्रीय शिक्षण देणार्‍या संस्था स्थापन कराव्यात, अशी काँग्रेस अधिवेशनांतून घोषणा करण्यात आली.

     याच सुमारास भारतीय कारखानदारी वाढू लागली होती. ब्रिटिश शासनाच्या साम्राज्यशाही धोरणाचा या कारखानदारांना अडथळा होऊ लागला. म्हणून त्यांनी स्वदेशी आंदोलनाला, पर्यायाने काँग्रेसच्या चळवळीला पाठिंबा दिला. पुढे महात्मा गांधींनी स्वदेशीला खादी ग्रामोद्योगाची जोड दिली. स्वदेशी मालाचा अभिमान हे राष्ट्रप्रेमाचे लक्षण बनले. १२ डिसेंबर १९३० रोजी परदेशी कापडाचा मालवाहू ट्रक अडविण्यासाठी मुंबईचा एक कामगार बाबू गेनू ट्रकसमोर आडवा झाला ट्रक त्याच्या अंगावरून बेमुर्वतखोरपणे नेला गेल्याने त्याला आपले प्राण गमवावे लागले. बाबू गेनूच्या हौतात्म्यामुळे अनेकांना देशप्रेमाची व स्वदेशीची स्फूर्ती मिळाली.

                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विश्वकोश.मराठी.गोव.इन)
                ------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.12.2023-मंगळवार.
========================================