आला आला श्रावणमास(बालगीत)

Started by sachinikam, August 05, 2024, 11:07:24 AM

Previous topic - Next topic

sachinikam

आला आला श्रावणमास   (बालगीत)
(कवीः सचिन कृष्णा निकम) (कवितासंग्रह: मुकुलगंध)

आला आला श्रावणमास
घेऊनि गंमती जमती खास
सुटला मातीला फुलांचा सुवास
हिरवळीची वसुधेला आरास.

घालता शीळ वा-याने, शर्यत ढगांची लागली
निळे-जांभळे धूसर-काळे, सुटले पळत मागेपुढे
ढमढम ढम ढमाक ढम, धडाडधम धडाडधम.

धडकला पहिला डोंगराला, पायथ्यापर्यंत गडगडला
फवारले तुषार रानात, न्हाली झाडेवेली डौलात
रिमझिम रिमझिम भिजले, ओले चिंब चिंब.

उडाला दुसरा उंचचउंच, उभारला सूर्यासमोर
उमटली सावली माळावर, रंगल्या गप्पा तासभर
डिंग डिंग डिंग, डिंगडीडी डिंग.

घालता शीळ वा-याने, उडाली धांदल सा-यांचीच
धावू लागले सैरावैरा, भिजला थुईथुई मोरपिसारा
छन छन छनननन, छन छन छन.

सूर्याला मग आली जाग
ढगांच्या गर्दीतून डोकावली मान
झटकुनि आळस जांभई दिली
सप्तरंगी चादर हवेत उडविली
छान छान छान, दिसते किती छान.

आला आला श्रावणमास
घेऊनि गंमती जमती खास
सुटला मातीला फुलांचा सुवास
हिरवळीची वसुधेला आरास.