विसर्जन गणपती बाप्पाचे

Started by Atul Kaviraje, September 18, 2024, 11:24:34 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्रांनो, वाचूया गणपती बाप्पांच्या विसर्जना नंतरची भावपूर्ण कविता--

झालंय विसर्जन कालच तुझं बाप्पा
सारखं वाटतंय, तू अजूनही आहेस
प्रसन्न हासून मला पाहतो आहेस,
तुझा मंगल आशीर्वाद देतो आहेस.

मखर तुझं तसंच ठेवलंय मी
मखरात तुझा आभास होतोय मला
आताच तुझी उत्तरपूजा आटोपलीय मी,
मनोभावे आरती ओवाळलीय मी तुला.

हुरहूर लावून तू निघून गेलास
अजुनी तुझी आठवण येतेय बाप्पा
वाटतं, अजुनी तू आहेसच घरात,
तुझ्या सेवेत दंग, मला पहात. 

तू आलास, आणि गावीही गेलास
कळलेच नाही, इथवरच होता प्रवास
तू येतोस, मला धीर देतोस,
माझ्या उदास मनाला उत्साही करतोस.

तुझा सहवास मला नेहमीच आवडतो
घरातलाच तू एक सदस्य वाटतो
परकेपणा नाही जाणवत कधीही तुझ्यात,
आपलेपणाने तू सर्वांच्याच मनात राहतोस.
 
आजही माझे अंतःकरण भरून आलेय
कंठ दाटलाय, डोळ्यांत पाणी आलेय
जवळचं सोडून गेल्यासारखंच वाटतंय मला,
जरी येणार असशील पुढल्या वर्षाला.

माझ्याच मनाला मग सांगते मी
सतत मनाची समजूत घालते मी
तुझे अस्तित्त्व आहे, चराचरात आहेस,
इथेच आहेस, माझ्या मनात आहेस.

हात जोडते मी मखरातल्या स्थानाला
आशीर्वाद देतोयस, मनातून जाणवतंय मला
पुढच्या वर्षी येशीलच, वाट पहातेय,
आतापासूनच तुझ्या आगमनाची तयारी करतेय.
 
--अतुल परब
--दिनांक-18.09.2024-बुधवार.
===========================================