गणपती बाप्पा माझा मित्र

Started by Atul Kaviraje, September 18, 2024, 11:27:36 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्रांनो, ऐकुया जरा ही लहानगी, गणपती बाप्पाच्या कानी काय सांगतेय ते--

सांगते हळूच कानात मी तुला
गुपित आहे, सांगू नकोस कुणाला
तुझी आणि माझी आहे मैत्री,
माझा मित्र आहेस तू चांगला.

तू तुझ्या गावी जाणार ना ?
असं आई काल म्हणाली मला
माझं काही काम आहे तुझ्याकडे,
ती करून तू जा गावाला.

आई माझ्यापाठी कटकट असते करत
खेळायला मला बिलकुल नाही पाठवत
अभ्यास कर, सारखी बसते सांगत,
समजावून सांग ना जरा आईला.

बाबा माझे आहेत खूप चांगले
ते आणि त्यांचे काम भले
आवड आहे मला खूप फिरायची,
सांग ना बाबांना मला फिरवायला.

दादा माझा नुसता मारकुटा आहे
वेणी ओढतो, पाठीत धपाटे घालतो
काहीतरी अद्दल घडव ना त्याला,
चांगलीच शिक्षा कर तू त्याला.

अभ्यासाचा नुसता मला येतो कंटाळा
सारखा तोच तोच धडा वाचायला
खूप बुद्धी दे तू मला,
परीक्षेत नंबर आण माझा पहिला.

चपाती भाजी खाऊन आलाय कंटाळा
मला मोदक आवडतात खूप खायला
मोदकांचे झाड लावून दे मला,
भूक लागल्यावर तोडीन मी मोदकाला.

माझ्याबरोबर खेळायला नसतं कधी कुणी
सारख्या अभ्यास करतात माझ्या मैत्रिणी
तू पाठवून दे तुझ्या उंदीर-मामाला,
मला आवडेल त्याच्याबरोबर लपाछपी खेळायला.

इतकं करून मग जा गावाला
माझ्याकडे काहीही नाही तुला द्यायला
माझा छोटासा नमस्कार स्वीकार बाप्पा,
विसरू नकोस तुझ्या लहान मैत्रिणीला.
 
--अतुल परब
--दिनांक-18.09.2024-बुधवार.
===========================================