विसर्जन गणपती बाप्पाचे

Started by Atul Kaviraje, September 19, 2024, 03:12:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

बाप्पा दिवस तुझ्या विसर्जनाचा उगवला
सकाळपासूनच मनास हुरहूर लावून गेला
तुला डोळा भरून पाहूदे मला,
कंठ तुझ्या आठवणीने दाटून आला.

तू जाणार, कल्पनाच नाही करवत
निरोप द्यायला मन नाही धजावत
माझ्या मनात वसला होतास तू,
तुझा हात नाही मला सोडवत.

स्वहस्ते तुझी स्थापना केली मी
मखरात स्वतःच्या हाताने बसवले मी
तुझ्या पूजेत कसर नाही केली,
तुझ्यात एकरूपच झाले होते मी.

आनंदात, उल्हासात तू घरी आलास
भक्तिभावे पूजीता, आशीर्वाद मज दिलास
वर्षभराचा माझा संकल्प पूर्ण केलास,
कृतार्थ झाले, माझ्याशी भरभरून बोललास.

दाटलाय कंठ, डोळ्यांत येतंय  पाणी
बाप्पा तुझ्या येतील मला आठवणी
त्याच आठवणी मी जपेन वर्षभर,
पुढील वर्षी तू ये लवकर.

डोळा भरून तुझे दर्शन घेते
नमस्कार करते, तुला निरोप देते
तुझी मंगल मूर्ती नयनांत साठवते,
गणपती बाप्पा मोरया, जयघोष करते.

--अतुल परब
--दिनांक-19.09.2024-गुरुवार.
===========================================