रम्य आणि सुंदर निसर्ग-स्वर्ग

Started by Atul Kaviraje, September 27, 2024, 10:06:00 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्रांनो, वाचूया या रम्य आणि सुंदर निसर्गाचे तितकेच सुंदर कवितारूपी चित्रण--

चिमटा काढून पाहीला स्वतःस मी
स्वप्नात तर नव्हतो ना मी
स्वप्न-नगरीतच आलो होतो मी आता,
नकाशात याचा कुठेही उल्लेख नव्हता.

समोर होता माझ्या भव्य-दिव्य निसर्ग
निसर्ग नव्हताच, तो होता स्वर्ग
कधीही, कुठेही नव्हता मी पाहीलेला,
अनुभव मला नव्हताच कधीही आलेला.

प्रत्येक गोष्ट सुबक होती इथली
सुंदर रंग-संगतीने सारीच कशी रंगलेली
जिथल्या तिथे साचेबद्ध होते सारेकाही,
धावपळ नव्हती, कुठेही नव्हती घाई.

सुंदर सजला होता इथला निसर्ग
वनश्रीने हिरवा बहरला होता निसर्ग
दूरवर उभी पर्वताची रांग निळी,
शिखरमाथा होता चुम्बीत, पोहोचत आभाळी.

आकाशाशी गुज होते करीत सारे
ढगांना वाहून नेत होते वारे
ढंगाचा पुंजका आकाशाच्या माथ्यावर सजला,
जणू अंबराने शुभ्र मुकुट घातला.

समोरूनच जात होती पायवाट घराकडे
वळसा घालून सरकत होती पर्वत-पायथ्याकडे
दुतर्फा अशोक वृक्षांनी लावलीय हजेरी,
कसे अदबीने आहेत उभे शेजारी-शेजारी.

उन्हाने गवतास झाक आणलीय सोनेरी
फुले लालभडक चमकताहेत भर दुपारी
पत्थरही प्रकाशतोय, परावर्तित करीत किरणे,
देखावा सुंदर, नयनांचे फेडतोय पारणे.

दाटीवाटीने उगवलीत फुले रंगीबेरंगी भुईवरी
रंगसंगती तयांची मनास मोहवीतेय न्यारी
एकलेच घर उभे बसके सुंदर,
उठून दिसतेय आगळेच, निसर्गात खरोखर.

भारलेल्या अवस्थेत मी होतो उभा
न्याहाळीत होतो निळ्या निळ्या नभा
मंत्रमुग्धच होते केले जादुई निसर्गाने,
पित होतो सौंदर्य अपलक दृष्टीने.

चित्रकारालाही नसती जमली अशी रंगसंगती
इतक्या सुंदर छटांची रेलचेल होती
कलाकृती महान होती ती निसर्गाची,
कल्पनाही पडेल थिटी त्यापुढेही सर्वांची. 

होय, खरोखरच स्वर्ग होता तो
या भूतलावरला नक्कीच नव्हता तो
मला साद घालीत होता तो,
मला आकर्षित करीत होता तो.

--अतुल परब
--दिनांक-27.09.2024-शुक्रवार. 
===========================================