माझे गावचे घर आणि अंगणातला फुलांनी बहरलेला मळा

Started by Atul Kaviraje, September 28, 2024, 09:40:33 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्रांनो, माझे गावचे घर आणि अंगणातला माझा फुलांनी बहरलेला मळा, यावरती एक कविता--

मिळताच सुट्टी मी येतो गावाला
मनःशक्ती, मनःशांती, मन:स्थैर्य, मनःस्वास्थ्य मिळवायला
शहरातील वातावरण गर्दीचे, धावपळीचे, पळापळीचे,
मनाचा तोल येथे ढळतच चालला.

जीवन येथले ताणाचे, तणावाचे, त्रासाचे
घड्याळाच्या काट्याप्रमाणे नुसतंच चालत रहायचे
स्थिरता नाही, स्थैर्य नाहीय येथे,
दिवस रात्रीचे गणितचं सारे चुकते.

गाव माझे सुंदर, आहे हिरवेगार
मोठ्या वाड्याला आहे सागाचे महाद्वार
अनेक खोल्या, एका माडीचे घर,
पवन खेळतो खोल्यांतून शीतल गार.

वनश्रीने बहरलंय माझं सारं गाव
हिरवाई वाहतेय ओसंडून, नाहीय ठाव
झाड-वृक्षांनी हिरव्या, घेरलंय माझं घर,
येथेच मला वाटतंय सुरक्षित फार.

सकाळच्या उन्हात कोवळ्या चमकतंय घर
उठून दिसतोय चिऱ्याचा प्रत्येक पत्थर
कौले लाल प्रकाशतात, पिवळ्या किरणांत,
सुंदर घराला आणिकच शोभा आणतात.

घराला लागूनच पुढती चौकोर अंगण
राखण तयाची करतेय लाकडी कुंपण
फुलांवर आहे माझे, अतिशय प्रेम,
आवडतं मला फुलांचं फुललेलं पाहणं.

प्रत्येक जातीची अंगणात फुले लावलीत
जातीने करतोय मी तयांची बागाईत
खतपाणी देतोय स्वहस्ते मी त्यांना,
लहान मुलांप्रमाणे करतोय त्यांची जोपासना.

तुम्हाला दिसेलच बाग फुलांनी डवरलेली
नाजूक रंगीबेरंगी विविध फुलांनी बहरलेली
टपोरी, टवटवीत, ताजी, रंगात रंगलेली,
नजाकत तयांची सुखद, नयनांत भरलेली.

शहरात नाहीय तिथे अंगण इथल्यासारखे
लहान कुंडीतच लावावी लागतात रोपे
एखादेच फुल उगवलेले पडते दृष्टीस,
नाही गवसत समाधान नयनांस, मनास.

गावी येऊन नयनांची भूक भागवतो
सतत, एकटक फुलांना न्याहाळत राहतो
सुकून, समाधान, शांतीचा अनुभव घेतो,
एक आगळीच अनुभूती, अननुभूती मिळवतो. 

ठरवलंय निवृत्त होताच गावी यायचे
विसरून शहर,  इथेच कायम रहायचे
बाग फुलवायची, फुलांना गोंजारायचे, कुरवाळायचे,
मधुर सुगंधात जगाचे भान विसरायचे.

फुलांची शेती करायची मी ठरवलंय
माझ्या अंगणाची व्याप्ती मी वाढवलीय
कधी आलात, घराला भेट द्या,
फुलांनी बहरलेला मळा नक्की पहा. 

--अतुल परब
--दिनांक-28.09.2024-शनिवार.
===========================================