एका सुंदर संध्याकाळचे कवितारूपी चित्रण

Started by Atul Kaviraje, September 30, 2024, 11:10:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्रांनो, आज पुन्हा एकदा वाचूया एका सुंदर संध्याकाळचे कवितारूपी चित्रण--

किती सुंदर दृश्य होते ते
सूर्याचे पाऊल पश्चिमेस वळत होते
दूर सागरात हळूहळू दिनमणीचे अस्तित्त्व,
आस्तेआस्ते, धीमेधीमे अस्तास चालले होते.

डोळे भरून मी पहात होतो
सौम्य रूप डोळ्यांत साठवत होतो
दिवसभर धावपळीने त्रस्त झालेला मी,
सुखद नजाऱ्याने शांत होत होतो.

असेही एक सुंदर रूप सूर्याचे
भिन्न भिन्न असते, सकाळचे दुपारचे
परिभ्रमण होऊन पश्चिमेस येऊन मावळण्याचे,
रात्रीस मंदावण्याचे, पुनःश्च सकाळी उगवण्याचे.

कालचक्र हे सुरूच अनंत काळचे
उगवणे, मावळणे पुन्हा उगवणे, मावळणे
सूर्यच आहे आपलं जीवन, जीवनस्रोत,
आहे सूर्य, म्हणूनच आपण आहोत.

असो, आजची संध्याकाळही आहे सुंदर
सूर्याला हळूहळू कवेत घेतोय सागर
लाल गोळा आता झालाय पिवळा,
निस्तेज, म्लान पडलाय तो सगळा.

तरीही रंग उधळणे सोडत नाही
विविध रंगांची क्षितिजावर उधळण होई
विझता विझताही खूप काही देई,
एक अनमोल, धडा शिकवून जाई.

 लाल-तांबड्या रंगाची पश्चिमेस होतेय उधळण
अनिमिष नेत्रांनी हृदयात करतोय साठवण
चित्रकारही कलाकृती पाहून दिग्मूढ होई,
महान निसर्गापुढे सहजच नतमस्तक होई.

निळ्या-निळ्या आभाळात शुभ्र ढग सजलेत
मावळतीचे रंग त्यांनीही शोषून घेतलेत
तयांच्या कडांना आलाय रक्तवर्णी लालीमा,
उठून दिसतेय अंबराची अथांग निलीमा.

सागराच्या जळास आलीय झाक लाल-सोनेरी
वाहून आणताहेत लाटा पडसाद किनारी
पाणी चमकतंय, प्रवाहतंय, खळखळ वहातंय,
हळूच येऊन किनाऱ्यावरल्या खडकांवर आदळतंय.

दूर तिथे मधोमध, सागराच्या जळात
नाव छोटीशी, नावाडी शांतपणे वल्हवीत   
हळूहळू प्रवाहत ती किनारा गाठतेय,
फक्त काळी-कभिन्नच तिची रेखाकृती दिसतेय. 

उजवीकडे दूर उभी खडकांची रांग
स्तब्ध, निश्चल पहात सागरास अथांग
झाकोळलीत तीही अंधाराने, आकृतीच दिसतेय,
लाटांचे जोरदार आदळणे ऐकू येतेय.

काही वेळातच जाईल सूर्य अस्तास
इथवरच होता दिनमणीचा दिवसभराचा प्रवास
अजुनी हवा होता सायंकाळचा सहवास,
मिळत होता मनास उत्साह, उल्हास.

सूर्यास्त झाल्यावरही तसाच होतो बसून
प्रतिबिंब सूर्याचे नयनांत ठेवलंय साठवून
गार वारा अंगाशी बिलगत होता,
समोरचा समुद्र अंधाराने गिळला होता.

पूर्वेकडे रात्रीने कूस बदलली होती
हळूहळू तिला जाग येत होती
दूर खेड्यात दिवे उजळले होते,
माझे पाऊल घराकडे परतत होते.

--अतुल परब
--दिनांक-30.09.2024-सोमवार.
===========================================