एका सुंदर परंतु उदास वाटणाऱ्या संध्याकाळचे कवितारूपी चित्रण

Started by Atul Kaviraje, October 01, 2024, 09:03:25 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्रांनो, आज पुन्हा एकदा वाचूया एका सुंदर परंतु उदास वाटणाऱ्या संध्याकाळचे कवितारूपी चित्रण--

कालचक्र निसर्गाचे असते सुरु निरंतर
सकाळ, दुपार संध्याकाळमध्ये असते अंतर
आजही झालीय संध्याकाळ, सूर्य मावळलाय,
क्षितिजावर निशाणी ठेवून अस्तास गेलाय.

मला थोडा उशिरच झाला यायला
मावळतीचे सूर्यदर्शन पारखे झाले मला
नेहमीच आवडतो मावळतीचा सूर्य पाहायला,
रूप त्याचे अनोखे नयनांत साठवायला.

दिनमणीचे केव्हाच झालेय विसर्जन पाण्यात
भेट रंगांची देऊन गेलाय क्षितिजास
पश्चिम दिशा अजुनी आहे उजळलेली,
सूर्याने सढळ हस्ते रंग-दान दिलेली.

हळूहळू उजेड मंदावत चाललाय आतासा
आभाळाने अजुनी रंग ल्यालाय बराचसा
ढग दाटलेत, काळ्या सफेद रंगांचे,
लवकरच होईल बहुधा आगमन पावसाचे.

इथल्या झुडुपातून स्पष्ट दिसतंय तळ
मंदावलाय  प्रवाह, स्थिर झालंय जळ
वाऱ्यानेही आताशी कुठे रजा घेतलीय,
झाडाचीही सळसळ ऐकू येईनाशी झालीय.

तळ्याचे पाणी अजूनही आहे चमकत
आभाळातील ढगांचे तयात प्रतिबिंब पडत
काठावरली वनश्री पाहतेय डोकावून तळ्यात,
हिरवा रंग मिसळलाय काळ्या रंगात.

इथल्या किनाऱ्यावरली हिरवाई शाबूत आहे
अंधाराची आस्तेआस्ते चाहूल लागत आहे
समोरील देखावा दाखवत आहे कातरवेळ,
सुरु झालाय संध्या-छायेचा नेहमीचाच खेळ.

वारा थांबलाय, गारवा आहे दाटून
अंग येतेय मध्येच मोहरून, शहारून
पाऊस बरसायला अजुनी अवधी आहे,
आभाळात ढगांची गर्दी जमली आहे. 

नेहमीप्रमाणेच निरव शांतता भरलीय कणाकणांत
पक्षी सारे परतलेत अपुल्या घरट्यात
वर्दळही नाही, कुणाची नाही चाहूलही,
वातावरण भासतेय भारलेले, आहे जादुई.
 
आजची संध्याकाळ काहीशी आगळीच भासतेय
आजची सायंकाळ काहीशी उदास वाटतेय
निर्जीव जणू, चैतन्यच हरवलंय कुणीकडे,
मरगळ, नैराश्येचे वातावरणच भरलंय सारीकडे.

जिवंतपणा नाही, जीवनरस घेतलाय शोषून
स्रोत जीवनाचा, केव्हाच गेलाय मावळून
पूर्वेकडे उभे राहिलेत दूत रात्रीचे,
साम्राज्य पसरेल हळूहळू भयाण अंधाराचे.

तरीही पावले माझी तिथेच रेंगाळताहेत
डोळे प्रकाशाचा, अंधाराचा खेळ पाहताहेत
अंधाराने प्रकाशावर पूर्णपणे मात केलीय,
आपल्या यशाची अंधार-पताका धरेवर फडकवलीय.

संध्येचे राज्य संपूर्ण खालसा झालेय
रजनीने आपले साम्राज्य उभे केलेय
अंधेरनगरीची सम्राज्ञी आहे ती आता,
राज्य तिचे आलंय भूतलावर आता.

--अतुल परब
--दिनांक-01.10.2024-मंगळवार.
===========================================