एका सुंदर संध्याकाळचे कवितेतून वर्णन

Started by Atul Kaviraje, October 03, 2024, 09:44:36 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्रांनो, आज पुन्हा एकदा वाचूया एका सुंदर संध्याकाळचे कवितेतून वर्णन--

सूर्य चालला अस्ताला, मावळतीच्या दिशेला
प्रवास दिनमणीचा इथवर येऊन संपला
क्षितिजावर येऊन सागरास तो मिळाला,
दोघांच्या उत्कट मिलनाचा क्षण आला.

पहाता पहाता दिनमणी सागरात बुडाला
क्षितिजावर रंगांची उधळण करून गेला
अस्तास जाता-जाता दान देऊन गेला,
पथ केला मोकळा येणाऱ्या रजनीला.
 
इथल्या किनाऱ्यावरून मी देखावा पाहीला
रंगांचा सुंदर, लाल तांबडा पिवळा
अंबरातील ढगांनीही थोडासा रंग चोरला,
अन अपुल्या कडांवरी सुंदर सजवला.

शुकशुकाट आहे सर्वत्र या कातरवेळेला 
नाही कुणीच येथे आजच्या सायंकाळला
वाऱ्याचाही जोर आतासा काहीसा मंदावला,
जळही शांत होत, प्रवाहही थांबला.

लालीमा आहे अजुनी क्षितिजी पश्चिमेला 
सूर्य जरी केव्हाचा अस्तास गेला
विझता सौम्य प्रकाश मागे ठेवला,
जीवनाचा स्रोत मगाच मावळून गेला.

चैतन्य, उल्हास, उत्साह लयास गेला
आस्ते-आस्ते सर्वत्र अंधार दाटू लागला
डोळे माझे सरावले हळूहळू अंधाराला,
चंद्राचा रथ दौडत पूर्वेकडून निघाला.

--अतुल परब
--दिनांक-03.10.2024-गुरुवार.
===========================================