एका नवीन रम्य सुंदर संध्याकाळचे यथार्थ कवितारूपी चित्रण व वर्णन

Started by Atul Kaviraje, October 04, 2024, 09:52:10 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्रांनो, आज पुन्हा एकदा वाचूया, एका नवीन रम्य सुंदर संध्याकाळचे यथार्थ कवितारूपी चित्रण व वर्णन-

निसर्ग देतो अनंत करांनी माणसास
दृष्टी असावी व्यापक निसर्गास ओळखण्यास
प्रत्येक गोष्टीत आहे सौंदर्य भरलेले,
परि मनुष्याने डोळे आहेत झाकलेले.

म्हणूनच मला फिरायला आवडतं निसर्गात
फिरत असतो एकटाच निसर्ग पहात
सकाळ मला नेहमीच मोहवून टाकते,
परंतु वातावरण संध्याकाळचे गुंगवून टाकते.

संध्याकाळच्या नेहमीच प्रेमात पडतो मी
दररोज सागर-किनारी येऊन बसतो मी
रूप भास्कराचे अनिमिष नेत्रांनी पहातो,
स्वरूप अनोखे नयनांत साठवून ठेवतो.

आजही तसंच झालं, काठावरती आलो
मावळत्या सूर्याचे प्रतिबिंब पाहू लागलो
अतिशय मनोहर, रम्य होता देखावा,
मावळतीचा सूर्य वाटत होता नवा. 

सूर्यास्त मला नेहमीच नवा वाटतो
भिन्न-विभिन्न रंगांची उधळण सूर्य करतो
नवनवीन रंगांची छटा येथेच सापडते,
पश्चिम दिशा नववधूसारखी नटते थटते.

आजचीही संध्याकाळ फारच सुंदर आहे
धीम्या गतीने सूर्य मावळत आहे
मंदावलाय तरीही किरणांत आहे जिवंतपणा,
विझतानाही नाहीय सोडत आपला बाणा.

इथून दृश्य स्पष्ट दिसत होतं
नागमोडी तळ लांबवर पसरलं होतं
दुतर्फा वनश्रीची हिरवाई फुलवत, सांभाळत,
संथ, मंद गतीने प्रवाहत होतं.

सूर्य डोकावून पहात होता तळ्यात
तळे चमकत, लखलखत होते किरणांत
अंबरातील ढगांनीही नव्हती सोडली संधी,
प्रतिबिंबाने त्यांच्याही बाजी मारलीय आधी.

आकाश माथ्यावरले निरभ्र , निळे मोकळे
पश्चिमेवर होते शुभ्र-कृष्ण ढग जमलेले
सोबत करीत असावेत बहुधा सूर्यास,
निरोप घेत असावेत जाता-जाता अस्तास.

दुरवरली रांग डोंगराची मिसळलीय काळोखात
रंग हिरवा मिसळलाय काळ्या रंगात
मावळत्या सूर्यास कवेत घेत होता,
आपल्या विशाल बाहूंत सामावत होता.

शेत दिसत होते हिरवे-काळे संधीप्रकाशात
गवतांची पाती झुलताना होतो पहात
बिलगत होता अंगास गार वारा,
करीत होता मनातल्या उदासीचा निचरा.

प्रसन्न करून गेली संध्याकाळ आजची
लहर उठवत होती मनात आनंदाची
रात्रीला अजून बराच होता अवकाश,
अजूनही होता पसरला सारीकडे संधिप्रकाश. 

--अतुल परब
--दिनांक-04.10.2024-शुक्रवार.
===========================================