एका संध्याकाळची परंतु उदास करणारी, निराश करणारी, चैत्यनंच हरवलेली कविता

Started by Atul Kaviraje, October 05, 2024, 09:37:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्रांनो, आजही एका संध्याकाळची परंतु उदास करणारी, निराश करणारी, चैत्यनंच हरवलेली चित्रकविता-

वळली पाऊले सूर्याची पश्चिम दिशेस
दिवसास घालून वळसा थांबली मावळतीस
इथेच संपेल दिनमणीचा आजचा प्रवास,
येईल स्थगिती चराचरात भरलेल्या जीवनास.

रोज असेच घडते, असेच होते
कालचक्र युगानुयुगे निरंतर सुरूच असते
दिवसाला रात्र कधीच भेटत नसते,
मिलन त्यांचे कधीच होत नसते.
 
सकाळ दुपारला खो देत असते
दुपार संध्याकाळचा निरोप घेत असते
संध्याकाळ रात्रीला जागा देत असते,
रात्र दिवसाचे स्वप्न पहात असते.

मनुष्य आहे अतिक्षुद्र निसर्गाच्या पुढे
तरी उगाच करीत असतो पुढे-पुढे
विराट स्वरूप जेव्हा लक्षात येते,
मस्तक त्याचे आदराने तेव्हाच झुकते.

असो, आजची सायंकाळ वेगळीच आहे
तिचे सौंदर्यच हरवून गेले आहे
रंगही तिचे फिक्कट वाटताहेत आज,
नाही चढलाय क्षितिजावर नेहमीच साज.

उदास करून जातेय आजची संध्याकाळ
एकाकी, एकटीच जाणवतेय आजची संध्याकाळ
नाही चैतन्य, हरपलाय उत्साह तिचा,
स्रोत हरवलाय, जणू उत्साहाचा, आनंदाचा.

निस्तेज किरणांचा सौम्य पट्टा पिवळा
पसरलाय क्षितिजावर भासतोय आगळा-वेगळा
निळ्या आभाळाला आलीय काळोखी किनार,
गर्भात दाटून राहीलाय तामसी अंधःकार.

सागरही शांत, पाणी त्याचे स्थिर
खळबळ, खळखळ थांबलीय, वाटतंय धीर-गंभीर.
मावळतीचा रंग सागराने शोषून घेतलाय,
तेजस्वी लाल गोलक तेजोहीन झालाय.

जरी सुंदर दृश्य सूर्याच्या अस्ताचे
पण जाणवतंय काहीतरी कमी असल्याचे
पट्टा डोंगराचा बुडत चाललाय काळोखात,
केव्हातरी चमकत होता तोही प्रकाशात.

येथल्या किनारी निष्पर्ण झाड एकले
गेलेय सुकून, पर्णहीन झालेय सगळे
अवशेष फांद्यांचे भकास दिसून राहीलेले,
रसहीन, जीवन रसाचा नामोनिशाणही नसलेले.

जळ नाहीय वहात, नाहीय आदळत
काठावरल्या वाळूला नाही येऊन भिजवत
सगळीकडे रखरखीत, शुकशुकाट, उत्साहाचा नायनाट,
वातावरण जाणवू लागलंय हळूहळू भयाण-भन्नाट.

मनाला पोखरून, जाचून टाकतेय कातरवेळ
बसत नाहीय साऱ्यांचाच आज मेळ,
नेहमीप्रमाणेच आहे सुरु खेळ संध्या-छायेचा,
रेंगाळतोय, थांबतोय, बुडतोय सूर्य मावळतीचा.

हवाही आहे पडलेली, कुठेतरी दडलेली
संध्याकाळची रयाच कुणीतरी चोरून नेलेली
नेहमीप्रमाणेच थांबून होतो मी बराचकाळ,
हतोत्साहीत, निरुत्साही करतेय आजची संध्याकाळ.

--अतुल परब
--दिनांक-05.10.2024-शनिवार.
===========================================