आजच्या या रंगहीन, उदास वाटणाऱ्या संध्याकाळचे कवितेतून वर्णन

Started by Atul Kaviraje, October 06, 2024, 09:13:12 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्रांनो, आजच्या या रंगहीन, उदास वाटणाऱ्या संध्याकाळचे कवितेतून वर्णन--

धुक्यात विरत चाललेली आजची संध्याकाळ
धुक्याने वेढलेल्या पश्चिम क्षितिजावरली संध्याकाळ
दाट धुक्याने सूर्याला ग्रासलेली संध्याकाळ,
धुक्यात सूर्यकिरणांना निस्तेज करणारी संध्याकाळ.

काठावरून इथल्या पाहतोय मी सूर्यास
सौम्य झालाय, मंदावलीय त्याची आच
पिवळी निस्तेज किरणे, उदासीने रंगलेली,
मलूल, मंद, किरणांची ज्योत मालवलेली. 

तळ्यात पडलाय फिक्कट प्रकाश सूर्याचा
प्रभाव होतोय  कमी जळातही किरणांचा
चमक तळ्याची कुठेतरी हरवून गेलीय,
पाण्यात लहरही आताशी उठेनाशी झालीय.

एखाददुसरा पक्षी आभाळात स्थिर विहरतोय
उडता उडता प्रतिबिंब पाण्यात पहातोय
काठावरले पक्षी स्तब्ध, निःशब्द आहेत,
कलरव, रव तयांचे थांबलेले आहेत.

आभाळही आहे निरभ्र, सुस्त झालेले
निळ्या रंगाला पिवळ्या रंगाने डसलेले
जिवंतपणा ढगांचा वाऱ्याने वाहून नेलाय,
रोख बदलून तोही वाहायचा थांबलाय.

अजुनी उभा पश्चिमेस मी अभिमुख
न्याहाळतोय सूर्यास, पाहतोय त्याचे स्वरूप
सूर्य हळूहळू झाडांआड दडु लागलाय,
क्षितीजाच्या कडांवर नजरेआड होऊ लागलाय.

सह्य आहेत सूर्याची आजची किरणे
उघड्या डोळ्यांनी पहातोय त्याचे बुडणे
पिवळ्या रंगाने माखलाय समोरचा देखावा,
इतर रंगांची आहे आज वानवा.

अंधकार हळूहळू तळ्यात साचू लागलाय
प्रकाशास धीमेधीमे आपल्यात खेचू लागलाय
अंधाराने केलीय आज प्रकाशावर मात,
भेदू शकत नाहीय काळोखाची कनात.

वातावरण होऊ लागलंय अधिकच धुंद-कुंद
प्रकाशाचा मार्ग होतोय जवळजवळ अरुंद
संध्या-छाया नाहीच, तिचा खेळही नाही,
आजच्या संध्याकाळमध्ये अजिबात जिवंतपणाच नाही. 

रोजच्याप्रमाणे मी अजुनी थांबलोय काठावर
सूर्यास पहात उभा, सुस्तावलेल्या दगडावर
चारीबाजुंनी अंधार दिशांना करतोय गिळंकृत,
माझीही आकृती बुडत चाललीय अंधारात.

निसर्गाचे असेही रूप कधीकधी दिसते
चैतन्य हरवलेले, उदास करणारे असते
उत्साह प्रदान करणारी सकाळची सूर्यकिरणे,
केवळ नावापुरतेच सायंकाळच्या सूर्याचे उरणे.

पुन्हा एकदा नव्याने उगवेल तो
पुन्हा उत्साह, उमेद जागवेल तो
उद्याची संध्याकाळ नक्कीच सुंदर असेल,
उदासीचे अजिबातच नामोनिशाण तेव्हा नसेल.

अशीच संध्याकाळ मला हवीय प्रकर्षाने 
नवजीवन देत, चैतन्य खेळवीत कलेकलेने
मावळत्या दिनकरा स्वीकार माझा नमस्कार,
तुझ्यामुळेच दूर होतोय जीवनातील अंधःकार.

--अतुल परब
--दिनांक-06.10.2024-रविवार.
===========================================