देवदर्शनास आलेल्या त्या सुंदर मुलीचे कवितेतून वर्णन

Started by Atul Kaviraje, October 06, 2024, 09:17:47 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्रांनो, सुंदर फुले घेऊन देवळात देवदर्शनास आलेल्या त्या सुंदर मुलीचे कवितेतून वर्णन--

उत्सुकता दिसतेय दाटलेली तुझ्या नयनांत
कुणाच्या ग आहेस प्रतीक्षेत इतक्यात ?
शिगेला पोचतेय, धीर नाहीय धरवत,
हुरहूर जाणवतेय कुणासाठीतरी तुझ्या मनात.

प्रसन्न दिसतेस, सुस्नात रूप तुझे
उपवनातून आलीस फुल तोडून ताजे
फुलांसारखीच तू दिसतेस ग टवटवीत,
यौवन तुझे बहरलेय, लावण्य रसरशीत.

शुभ्र डोकावताहेत फुले हातातल्या परडीमधुनी
सुगंध तयांचा घमघमतोय चारी दिशांतुनी
तुही झालीस फुल सुंदर फुलांमध्ये,
या सर्वांत तूच दिसतेस उठुनी.

निळी झुळझुळीत साडी ल्यालीस अंगावरी
ठिपठिपक्यांचा पदर खुलून येतोय साडीवरी
उजळतोय पदरकाठ भरजरी रेशमी जरतारी,
खुलून दिसतोय, शोभतोय गौर वर्णावरी.

तुझे स्वतःकडेच लक्ष नाहीय ग
महिताहे तुला, सुंदर आहेस ग
रेशमी कुंतल रुळती वाम खांद्यावरी,
मोगऱ्याने उजव्या बाजूस लावलीय हजेरी.

याही प्रहरी तू सोन्याने मढलीस
सुवर्णांच्या दागिन्यांनी तू सतेज उजळलीस
डोळे आहेत अजुनी त्याच्या वाटेकडे,
लक्ष जातंय वारंवार त्याच्या येण्याकडे.

देवळात आलीस तू देवाच्या दर्शनाला
या मंगल प्रभाती, निसर्गाच्या बहराला
वाटते थांबलीस त्याच्यासाठी, उत्कंठा पराकोटीची,
कुणाचीतरी आहे आस, असावा सोबतीला.

अजुनी तू बावरी, पावलांस भिंगरी
डोळ्यांचे पाखरू बेचैन, इथंतिथं भिरभिरी
कुणाचा घेतेस थांग, सांग तरी ?
कुणाला ग शोधतेस रम्य प्रहरी ?

तळमळ, तगमग दिसतेय तुझ्या अंतरातली
हासुनी जरी तू पाहसी सुदूर
कधी पाहीनसे झालंय तुला, त्याला,
नजर शोधतेय तुझी त्याला दूर-दूर.

भाव तुझ्या नजरेतला मला कळला
प्रीतीचा अंकुर दिसला त्यात रुजलेला
राधे थांब जराशी, आवर स्वतःला,
ऐक, कृष्णाचा मधुर पावा वाजला.

--अतुल परब
--दिनांक-06.10.2024-रविवार.
===========================================