किती वेळा-दत्त गाणे

Started by विक्रांत, February 12, 2025, 04:10:33 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

किती वेळा
********
किती वेळा तुझ्या दारी पुन्हा पुन्हा मी रे यावे
एकदाही तुज का रे न वाटे मज भेटावे ? ॥१

काय करू हृदय हे तुझ्या पदी अंथरले
बजावते मन किती परी तया ठोकरले ॥२

याद तुझी आली नाही दिस असा गेला नाही
मोह माझा घनीभूत तुला सोडवत नाही ॥३

सारे काही सोडूनिया जाईल मी देशोधडी
तुझी स्मृती ठेवीन रे करूनिया खोल घडी ॥४

येऊ नये तुझ्याकडे पाहू नये तुझ्याकडे
गोळा पुन्हा करू नये काळजाचे हे तुकडे ॥५

ठरविले लाख वेळा जमले न एक वेळा
धाव घेती तुझ्याकडे प्राण डोळा होत गोळा ॥६

एक वेळ यावयाला तुज काय धाड पडे ?
जळतो मी अंतरात अन् तुझा खेळ घडे ॥७

जाळूनिया छळुनिया काय सुखी होशील तू
दुर्लक्षून मज असे मजेत का राहशील तू ? ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘ 🕉� -